ओमायक्रॉन : खरंच भयावह का केवळ बागुलबुवा?

कोरोना नंतरच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर आता जगभरात ओमायक्रॉनची भीती वाढू लागलीय याच पार्श्वभूमीवर डॉ.पद्मनाभ केसकर यांचा हा विशेष लेख


काय आहे हे ओमायक्रोन (Omicron) प्रकरण ?

गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉन (B.1.1.529) या कोरोना च्या नवीन आलेल्या Variant ची मोठ्या प्रमाणावर चर्चा  मीडियामध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये चालू असलेली दिसत आहे. 

B.1.1.529 हा कोरोना व्हायरसचा नवीनतम mutated strain साऊथ आफ्रिका आणि सभोवतालच्या काही देशांमध्ये सापडला आहे. ज्याचे नामकरण WHO ने ओमायक्रॉन (Omicron)असे केले आहे. तसेच या बदललेल्या व्हायरसला Variant Of Concern (VOC) असे त्यांनी जाहीर केले.

या ओमायक्रॉन (Omicron) Variant मुळे इन्फेक्शन झालेल्या लोकांची संख्या सद्यमीतिला कमी असली तरी त्याची चर्चा एवढी का होत आहे?

यामागचं कारण म्हणजे लोकांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची अनामिक भीती मनात आहे. लसीकरणामुळे सर्व काही ठीक ठाक चालले आहे आणि आता तिसऱ्या लाटेची काही काळजी करण्याचे कारण नाही असे वाटत असतानाच या कोरोना च्या mutated (ऊतपरिवर्तित) Omicron strain ची बातमी येऊन धडकली .... आणि लोकांची धडधड वाढली !!

कोरोनाच्या संभवित तिसऱ्या लाटेचे बिज तर या ओमायक्रॉन मध्ये नाही ना ही शंका उत्पन्न व्हायला लागली. हा ओमायक्रॉन strain ( B.1.1.529 ) एवढा धोकादायक का समजला जातो आहे ?

हा जो B.1.1.529 ऊतपरिवर्तित strain आहे तो डेल्टा व्हायरस मध्ये उत्परिवर्तन होऊन निर्माण झालेला आहे. पण तरी तो पूर्णपणे वेगळा आहे त्याला आपण डेल्टा प्लस म्हणू शकत नाही.

जो वुहान चा मूळ व्हायरस आहे त्याच्या Spike प्रोटीन मध्ये म्हणजे वरच्या काटेरी आवरणामध्ये 32 mutation ( उत्परिवर्तन ) होऊन हा नवीन strain तयार झालेला आहे. 

हा स्पाईक प्रोटीन मध्ये इतक्या वेगाने झालेला बदल अकल्पनीय आणि धक्कादायक आहे. म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याकडील दुसऱ्या लाटेचा जनक किंवा जगभर हाहाकार माजवणारा जो डेल्टा व्हेरीअँट आहे तो उतपरिवर्तित होताना त्याच्या स्पाईक प्रोटीन मध्ये मूळ व्हायरस पेक्षा केवळ 9 बदल झाले होते आणि या ओमिक्रोन च्या स्पाईक प्रोटीन मध्ये तब्बल 32 बदल झाले आहेत.

स्पाईक प्रोटीन म्हणजे बाह्यतः असलेले काटेरी आवरण. त्याच्यात बदल जितके जास्त तितके आपल्या शरीराला किंवा आपल्या Immune system ला त्या व्हायरसला ओळखणे अवघड.  मग ती Immune सिस्टीम Vaccine मुळे निर्माण झालेली असू किंवा आधीच्या झालेल्या कोरोना च्या आजारामुळे निर्माण झालेली असो या इम्यून सिस्टिमच्या मेमरी मध्ये जे मूळ रूप कोरोनाव्हायरस चे साठवून ठेवलेले असते तसाच किंवा त्यामध्ये काही बदल झालेला सुद्धा व्हायरस परत प्रवेशित झाला तर आपली Immune सिस्टीम जागृत होऊन त्या व्हायरसचा नायनाट करते. पण जर का व्हायरस मध्ये मुख्यता त्याच्या बाह्य रूपामध्ये प्रचंड प्रमाणात परिवर्तन झाले व बाह्य रूप आमूलाग्र बदलले तर आपल्या शरीराला किंवा Vaccine मुळे निर्माण झालेल्या प्रतिकारशक्ती ला त्या व्हायरस ला ओळखणे अवघड जाते आणि चकवा देऊन त्या व्यक्तीला परत इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

तसेच हा व्हायरस जेव्हा नाकातोंडातून शरीरात प्रवेश करतो तेव्हा श्वास मार्गाच्या वरील भागात तो या काटेरी आवरणामुळे चिकटून राहतो. हे काटेरी आवरण जितके दाट आणि चांगल्या दर्जाचे तेवढी त्या व्हायरसची एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पसरण्याची क्षमता (Infectivity) वाढत जाते. Survival of fittest या न्यायाने व्हायरस सुद्धा स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवत असतो , हा जो ओमायक्रॉन हा Covid व्हायरस चा strain आहे तो त्याच्या बदललेल्या काटेरी आवरणामुळे जास्त प्रसरणशील (Infectious) झाला आहे असे लक्षात आले आहे. 

सध्या जगातल्या कोणत्या भागात ओमायक्रॉन चे पेशंट आढळत आहेत ?
 
ओमायक्रॉन ( B.1.1.529 ) हा सर्वप्रथम आफ्रिकेतील बोटस्वना येथे 11 नोवेंबर रोजी आढळला त्यानंतर तीनच दिवसात तो साऊथ आफ्रिका आणि नंतर तिथून होंगकोंग,  इस्राईल , बेल्जियम इत्यादी देशात आढळला.



आफ्रिका आणि सभोवतालच्या भागातच जास्ती प्रमाणात हे असे नवीन व्हायरस चे प्रकार का आढळतात?

याचे कारण म्हणजे आफ्रिकेमधील राष्ट्रे ही गरीब आहेत (अपवाद साऊथ आफ्रिका) . 


या ठिकाणी लसीकरणाचे प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे व्हायरसच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती खूप कमी लोकांकडे आहे. तसेच या देशांमध्ये HIV पॉझिटिव्ह लोकांचे प्रमाण पण बरेच आहे. असे प्रतिकारशक्ती कमी असलेले Host हे व्हायरस च्या दृष्टीने इन्फेक्शन साठी आणि mutation होण्यासाठी आगार असते. संशोधनानुसार या ओमिक्रोन चा पहिला पेशंट हा HIV पॉझिटिव पेशंट होता. खरंतर लोकांचे म्हणणे आहे की केवळ काही शेकड्यां मध्ये जगभरात आढळलेल्या या Variant च्या इन्फेक्शन च्या केसेस मुळे एवढे चिंतीत होण्याची खरोखर गरज आहे का ? .... याच उत्तर म्हणजे सध्या आपण दुधाने चटका बसला म्हणून ताक सुद्धा फुंकून पीत आहोत !  



पहिली लाट ओसरून दुसरी लाट आली त्यावेळी सुद्धा लोकांना असं वाटलं होतं की आता कोरोना संपला आणि काळजी घ्यायचे बंद केले. त्यावेळी महाराष्ट्रामधील औरंगाबाद आणि आजूबाजूच्या भागात वेगळ्या पद्धतीच्या वेगाने पसरणाऱ्या कोरोना च्या नवीन बदललेल्या strain च्या केसेस सापडायला लागल्या. तो mutated strain होता - B.1.617.2 ... ज्याचे नामकरण नंतर डेल्टा व्हायरस असे केले गेले. तेव्हा सुद्धा असे वाटले होते की भारतामधील महाराष्ट्रामधील एका छोट्याशा भागांमध्ये या काही वेगळ्या केसेस सापडत आहेत त्याची एवढी चिंता करण्याची गरज आहे का ?


आणि त्यानंतर जे काही झाले तो एक काळा इतिहास होता., त्या डेल्टा मुळे जी दुसरी लाट आपल्या देशामध्ये आली त्यामध्ये अत्यंत कमी कालावधी मध्ये आपल्या देशामध्ये केवळ जास्ती केसेस नाहीत तर जास्त मृत्यू पण झाले. पहिल्या लाटेमध्ये जास्त वृद्ध व्यक्ती मृत्यू पावले तर दुसऱ्या लाटेमध्ये डेल्टा मुळे तुलनात्मक रित्या जास्त तरुण आणि मध्यमवयीन लोकांचा मृत्यू झाला.त्या डेल्टा चा धसका अजून सुद्धा लोकांच्या मनामध्ये आहे.

डेल्टा मुळे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात हाहाकार माजला. अशा त्या डेल्टा च्या स्पाइक प्रोटीन मध्ये केवळ नऊ बदल झालेले असताना सुद्धा शरीराच्या प्रतिकार शक्तिला चकवा देण्याची ताकद त्याच्यात निर्माण झालेली होती. इथे तर ओमायक्रॉन मध्ये तब्बल 32 बदल स्पाईक प्रोटीन मध्ये झालेले आहेत.


त्यामुळेच जगभरातील डॉक्टरांना  चिंता आहे की लसीकरणामुळे निर्माण झालेल्या प्रतिकारशक्‍तीला छेद हा ओमायक्रॉन करणार तर नाही ना ?


आपली सारी भिस्त ही लसीकरण व निर्माण झालेल्या सामूहिक प्रतिकार शक्तीवर आहे सध्या केसेस कमी झाल्यामुळे नियम तर आपण (लोकांनी) केव्हाच धाब्यावरती बसवले आहेत! आपण जवळपास 120 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे ज्याचा आपल्याला इन्फेक्शन आटोक्यात आणण्यासाठी चांगला उपयोग झालेला आहे. पण जर का हा ओमिक्रोन वेगाने पसरला व लसीकरणाच्या प्रतिकार शक्तीला दाद दिली नाही तर तिसऱ्या लाटेचा धोका संभावतो म्हणून शासन व आरोग्य यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत. त्यांना साथ आपण आपल्या कोव्हिड सुसंगत वर्तनाची (Covid Apropriate Behavior) जर का दिली तर ओमिक्रोन (Omicron) तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेवर आपण नक्कीच विजय मिळवू शकू. तसेच जास्तीत जास्त लोकांनी वेगाने लसीकरण मोहिमेत भाग घेऊन आपले पूर्ण लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.

TOGETHER WE CAN DEFEAT OMICRON!!

-डॉ. पद्मनाभ केसकर
Emergency Management Expert,  Pune .


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.