सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्तिकस्वामींचे मंदिर

● गणपतीच्या मोठ्या भावाचे मंदिर
● त्रिपुरारी पौर्णिमेचा दर्शन सोहळा
● दीपमाळ नसलेले कौलारु मंदिर

सिंधुदुर्ग जिल्हा हि देवभूमी आहे..इथल्या मातीच्या कणाकणात, झाडापेडात, नदीपाण्यात असलेले देवत्व इथल्या जगण्याचा कुलाचार झालाय. असेच एक आगळेवेगळे मंदिर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हिंदळे गावातील श्री कार्तिकस्वामींचे मंदिर आहे !भारतात काही मोजक्या ठिकाणी असलेल्या देवस्थानमधील एक ठिकाण कार्तिक स्वामी मंदिर आहे

श्री कार्तिकस्वामी हे बुध्दी,साहस आणि यशस्वितेचे प्रतिक मानले गेले आहे. तो शिवगणांचा सेनापती मानला जातो. त्यामुळे ज्ञानसंपन्नता, यशस्विता आणि इतर सर्व शुभगुणांचे अधिपत्य श्रीकार्तिकेयाकडे आहे. वर वर्णन केलेल्या पर्वणीकाळात त्याचे दर्शन घेणे हे "धनसंपत्तीकारक"ही मानले गेले आहे. कार्तिकस्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आगामी सबंध वर्ष हे धनलाभाचे जातेच असा समज आहे.

हिंदळे येथील श्री देव कार्तिकस्वामी मंदिर हे कौलारू आहे. गाभा-यात कार्तिकस्वामींची संगमरवरी पूर्णाकृती मूर्ती असून तिची उंची सुमारे तीन फूट असून मोराच्या वाहनावर ती आरूढ झालेली आहे. मूर्तीला पुढे तीन व मागे तीन अशी सहा मुख व सहा हात असलेली षडानन रूपातील असून तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी आयुधे आहेत. पाठीमागे चार फूट उंचीचा आरसा असल्याने त्यात मागील मुखांचं प्रतिबिंब भाविकांच्या दृष्टीस पडते.




संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री कार्तिकस्वामींचं हे एकमेव असं मंदिर असल्याने दरवर्षी तिथे त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. कार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्रावर पौर्णिमा असते, तेव्हा श्री देव कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग येतो.

कारण अन्य दिवशी या मंदिरात महिलांना प्रवेश नसल्याने महिला व विशेषत: नवदाम्पत्यांनाही एक पर्वणीच असते. इतर दिवशी पुरुष भाविकांना दर्शन घेता येते; परंतु गाभारा बंद असतो. या दिवशी दर्शन घेऊन पूजा केली तर बुद्धी व अर्थवृद्धी होत असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होण्याच्या आशेने शेजारच्या कर्नाटक व गोवा राज्यांसह जिल्हा-परजिल्हयांतील भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी असते.योगकाळ भाद्रपद महिन्यात अत्यंत कमी असतो,त्यावेळी इथे महिलांना विशेष प्राधान्य दिले जाते. या वर्षी भाविक सर्वदूरहून प्रचंड गर्दी करतील, यात शंकाच नाही. स्कंद षष्ठी हा भाद्रपद महिन्यातील योगही महत्त्वाचा मानला जात असला तरी त्याचा योग काळ अत्यंत कमी असतो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाचा ओघ आता वाढत चाललाय. देवगड तालुक्यातील अनेक धार्मिक स्थळीही पर्यटकांचा ओघ असतो. त्या परिक्रमेत देवगडच्या हिंदळेमधील श्रींकार्तिक स्वामींचे हे मंदिर आवर्जून भेट देण्यासारखे आहे

- sindhudurg360°

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. स्त्रीयांसाठी वर्षा तून एकदाच दर्शन योग

    ReplyDelete