'तुका म्हणे आता' : नव्या सुरुवातीची नवी नांदी

● आणि मनडोहात पुन्हा तरंगल्या तुकारामांच्या गाथा

● आचरेकर प्रतिष्ठानच्या पहिल्या व्यावसायिक नाटकाने दिला पुन्हा नवा विचार

●तुका म्हणे आता या नाटकावर रसिक प्रेक्षकांनी उमटवली पसंतीची मोहर 

प्रायोगिक रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या कणकवलीच्या वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने  प्रथमच व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल टाकताना पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीतून साकारलेल्या संगीत  'तुका म्हणे आता' या नाटकाचे शिवधनुष्य लीलया पेलल्याचे कणकवली आणि मालवणच्या नाट्य प्रयोगानंतर सिद्ध झाले आहे. सौ. स्वाती राजेंद्र कदम निर्मिती आणि रघुनाथ कदम दिग्दर्शित या नाटकात सुप्रसिद्ध नेपथ्यकार अंकुश कांबळी यांनी केलेले नेत्रदीपक नेपथ्य याबरोबरच तुकारामाची भूमिका करणाऱ्या कुणाल आंगणे या कलाकाराचा सयंत अभिनय आणि त्याला सर्वच कलाकारांनी दिलेली यथायोग्य साथ यामुळे हे नाटक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते.


कोरोना महामारीमुळे बंद असलेली  नाट्यगृहे कोरोना प्रतिबंधक नियमांना अधीन राहून उघडली गेल्याने  नाट्यगृहांमध्ये पुन्हा एकदा नांदीचे स्वर आणि घंटेचा नाद घुमू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कणकवलीच्या वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि सौ. स्वाती कदम निर्मित 'तुका म्हणे आता' हे संगीत प्रधान नाटक बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर आणले आहे. या नाटकाचे शुभारंभाचे दोन प्रयोग आचरेकर प्रतिष्ठानने आपल्या होम पिचवर म्हणजेच कणकवली येथे तर निर्मात्या सौ. कदम यांनी मालवणला आयोजित करून व्यावसायिक रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले आहे.


 या पूर्वी आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने प्रायोगिक रंगभूमीवर १४ नाटके तर १९ एकांकिका सादर केल्या आहेत. सिंधुदुर्गातील कलावंतांना बरोबर घेऊन रंगभूमीवर तुका म्हणे आताच्या टीमचे कणकवली येथील शुभारंभाच्या प्रयोगानंतर ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे  यांनी या नाटका विषयी गौरवोद्गार काढीत शाबासकीची थाप दिल्याने कलाकारांचा उत्साह दुणावला आहे या नाटकाचे दिग्दर्शक श्री. रघुनाथ कदम यांनी आपले दिग्दर्शकीय कसब पणाला लावत तुका म्हणे लोकांसमोर सादर केला. 

 पूर्वीच्या काळी रंगमंचावर फक्त एक दोन काळे पडदे लावून सादर केले जाणारे हे नाटक सौ. कदम यांनी नव्याने रंगभूमीवर आणताना नेपथ्यात कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये अशा सूचना सौ रश्मी कदम यांनी दिल्याने या नाटकात तुकारामाचे घर, मंबाजीचा वाडा आणि इंद्रायणीचा काठ अशा तीन टप्यात नेपथ्य बनविण्यात आल्याचे अंकुश कांबळी यांनी सांगितले. 

संत तुकाराम महाराजांवर यापूर्वी अनेक नाटके, चित्रपट आले त्यातले तुका म्हणे आता हे एक नाटक होय.  संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले अभंग इंद्रायणीच्या डोहात मंबाजीने बुडविल्यानंतर त्या अभंगासाठी तुकाराम महाराज विट्ठलासमोर १४ दिवसांच्या अन्नत्याग करतात आणि त्यानंतर ते अभंग पाण्यावर तरंगतात  अशा साध्यासोप्या कथानकावर आधारित असलेले हे नाटक आहे. 


या संदर्भात बोलताना निर्मिती सहाय्यक श्री. राजेंद्र कदम यांनी तुकाराम महाराजांवरील अनेक नाटकांचे वाचन आपण केले मात्र, पु. ल यांच्या या नाटकाने जो संदेश दिला आहे तो फार महत्त्वाचा आहे. या पूर्वी या विषयावर आलेली नाटके किंवा चित्रपट म्हणा यामध्ये इंद्रायणीच्या डोहात बुडविलेले अभंग पाण्याच्यावर तरंगतात असे दाखविले आहे मात्र, पु लं च्या या नाटकात सर्वसामान्यांना मुखोद्गगत असलेले तुकारामाचे अभंग रामशास्त्री व इतरांकडून लिहिले जातात असा विचार मांडण्यात आला आहे. त्यामुळे हा विचार महत्वाचा असल्याने हे नाटक रंगभूमीवर आणल्याचे सांगितले. तर नाटकाचे दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी आपल्यासाठी पुलं चे हे नाटक एक आव्हान होते. 


या नाटकात तुकारामाची भूमिका करणाऱ्या कुणाल आंगणे या युवा कलावंतांचे नेपथ्यकार अंकुश कांबळी यांनी सुचविले होते.असे सांगितले एकूणच कुणाल आंगणे याने  तुकाराम महाराजांची समर्थपणे साकारलेली  भूमिका व या नाटकात काम करणाऱ्या श्याम नाडकर्णी (मंबाजी), शरद सावंत (शिवाजी महाराज, राम शास्त्री), राजेंद्र कदम (पिऱ्या), विकास कदम (गेन्या), सुधीन तांबे (संतू), सुविधा कदम (आवली), प्रियांका भुसळे (जानकी), पंकज कदम (चोपदार),  यांनी केलेला सहज सुंदर अभिनय केल्याने हे नाटक रसिकांच्या मनावर पकड घेते. यात संगीताची बाजू मंगेश कदम, मृदंग/तबला वैभव मांजरेकर, रंगभूषा/वेशभूषा तारक कांबळी, नेपथ्य निर्माण अजय पुजारे, रमेश सुतार, रंगमंच व्यवस्था रवी सावंत, प्रॉपर्टी पंकज कदम यांनी तांत्रिक बाजू समर्थपणे सांभाळली आहे.

एकूणच तुका म्हणे आता या नाट्यकलाकृतीने केवळ फक्त प्रयोग सादर केला नाही तर लॉकडाऊन नंतर ठप्प झालेल्या कोकणातल्या नाट्यकलेला नवी उभारी दिलीय. एक भव्यदिव्य संगीत नाटक आणि तेही व्यावसायिक पद्धतीने सादर करत अनेक रंगकर्मींचा विश्वास आता दुणावलाय. आणि हीच तिसरी घंटा अनेकांना पुन्हा नाटकं सादर करायला भाग पाडणारी नांदी ठरणार आहे !

© sindhudurg360°

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.