1 ऑक्टोबरपासून बदलतायत हे आर्थिक नियम

1 ऑक्टोबरपासून तुमच्या बँक आणि पगाराशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. पुढील महिन्यापासून अनेक दैनंदिन गोष्टी बदलणार आहेत. यामध्ये बँकिंग नियमांपासून एलपीजीपर्यंत अनेक बदलांचा समावेश आहे.


ऑटो डेबिटवर महत्वपूर्ण निर्णय

देशभरातील सर्व बँकांच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. १ ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)चा नियम तुमच्या क्रेडिट/ डेबिट कार्डवरून होणाऱ्या ऑटो डेबिटसाठी लागू केला जाणार आहे. या अंतर्गत, डेबिट आणि क्रेडिट कार्ड किंवा मोबाईल वॉलेट्समधून होणारे ऑटो डेबिट तोपर्यंत होणार नाहीत, जोपर्यंत ग्राहक त्याची मान्यता देणार नाही. या व्यवहाराच्या मंजुरीसाठी ग्राहकाला एक एसएमएस पाठवला जाईल. ऑटो डेबिट म्हणजे ईएमआय कटसारखे स्वयंचलित ऑन-टाइम होणारे व्यवहार होय.

पेन्शन नियमांमध्ये बदल होणार

1 ऑक्टोबरपासून डिजिटल लाईफ सर्टिफिकेटशी संबंधित नियम बदलत आहेत. आता देशातील सर्व वृद्ध निवृत्तीवेतनधारक जे 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, ते देशातील सर्व प्रमुख पोस्ट ऑफिसच्या जीवनप्रदान केंद्रात डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील, यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आलीय. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे काम टपाल कार्यालयाच्या माध्यमातून सुरू होणार आहे. त्यामुळे भारतीय डाक विभागाने जीवनप्रदान केंद्राचा आयडी आधीच बंद असेल, तर वेळेवर कार्यान्वित होईल याची खात्री करण्यास सांगितले.

जुने चेकबुक 1 ऑक्टोबरपासून चालणार नाही

1 ऑक्टोबरपासून तीन बँकांची चेकबुक आणि एमआयसीआर कोड अवैध होतील. या बँका म्हणजे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC), युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि अलाहाबाद बँका आहेत. या बँका अशा आहेत, ज्या अलीकडे इतर बँकांमध्ये विलीन झाल्यात. बँकांच्या विलीनीकरणामुळे खातेधारकांच्या खाते क्रमांक, IFSC आणि MICR कोडमध्ये बदल झाल्यामुळे 1 ऑक्टोबर 2021 पासून बँकिंग प्रणाली जुना धनादेश नाकारेल. या बँकांची सर्व चेकबुक अवैध ठरतील.

गुंतवणूक संबंधित नियमांमध्ये बदल होणार

बाजार नियामक सेबीने (सेबी) आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन नवीन नियम आणलाय. हा नियम असेट अंडर मॅनेजमेंट (AMC) अर्थात म्युच्युअल फंड हाऊसमध्ये काम करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. मॅनेजमेंट कंपन्यांच्या मालमत्तेच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकूण वेतनाच्या 10 टक्के रक्कम त्या म्युच्युअल फंडाच्या युनिटमध्ये 1 ऑक्टोबर 2021 पासून गुंतवावी लागेल. तर 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत टप्प्याटप्प्याने ते पगाराच्या 20 टक्के असेल. गुंतवणुकीला लॉक-इन कालावधी देखील असेल.

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होणार

1 ऑक्टोबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती एलपीजी आणि व्यावसायिक सिलिंडरच्या नवीन किमती निश्चित केल्या जातात.

खासगी दारूची दुकाने बंद

1 ऑक्टोबरपासून दिल्लीत खासगी दारूची दुकाने बंद होतील. 16 नोव्हेंबरपर्यंत मदिरा फक्त सरकारी दुकानांमध्ये विकली जाईल. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, नवीन अबकारी धोरणाअंतर्गत राजधानीचे 32 झोनमध्ये विभाजन करून परवाने वाटपाची प्रक्रिया करण्यात आली आहे. आता 17 नोव्हेंबरपासून दुकाने फक्त नवीन धोरणांतर्गत उघडतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.