आर्थिक व्यवहारासाठी चेकचा (धनादेश) वापर करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्ट-2020 मध्ये चेकसाठी 'पॉझिटिव्ह पे सिस्टीम' जाहीर केली होती. येत्या 1 सप्टेंबरपासून देशातील बॅंका ही प्रणाली लागू करण्याची शक्यता आहे.
आरबीआयच्या नव्या नियमानुसार, खातेधारकांना त्यांच्या इच्छेनुसार 50 हजार वा त्याहून अधिक रकमेच्या धनादेशासाठी 'पॉझिटिव्ह पे सिस्टीम' लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार धनादेश देतानाच तुम्हाला बँकेला तपशील द्यावे लागतील, अन्यथा बॅंका तुमचा चेक नाकारु शकतात. ऑनलाईन बँकिंग न वापरणाऱ्या ज्येष्ठांना हे अडचणीचे ठरू शकते.
दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया, एक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँकेसह काही बॅंकांनी 50,000 रुपयांवरील धनादेशांसाठी 'पॉझिटिव्ह पे सिस्टीम' लागू केली आहे. त्यानुसार ग्राहकांना नेट / मोबाईल बँकिंगद्वारे वा बॅंक शाखेला भेट देऊन चेकचा तपशील द्यावा लागेल.
सध्या या बँकांनी ते ग्राहकांसाठी ही प्रणाली पर्यायी ठेवली आहे. ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेऊन ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्याद्वारे ग्राहकांची चेकमध्ये कोणतीही फसवणूक होणार नाही.