आणि 'कासव' पुन्हा जिंकला !!!

सोनी मराठीवरच्या 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमातुन त्या हॉटसीटवर बसलेल्या एका मालवणी स्पर्धकांच्या मालवणी कवितेचा आता सोशल मीडियावर बोलबाला सुरु झालाय.. 'अरे मेल्या पावसा' ही पूर्ण मालवणी कविता आणि तीही सुंदर पाठांतराने केलेल्या सादरीकरणातून त्या स्पर्धकांपेक्षा 'मालवणीची' अवीट गोडी सांगणारी ठरलीय. त्या स्पर्धकांबद्दल प्रत्येकाला आज जाणून घ्यायचे आहे. त्याबद्दल उलगडून सांगण्याअगोदर एका 'कासवाची' गोष्ट सांगतो

गोष्ट साधारण तो मुलगा चौथीत होता तेव्हाची आहे. मुंबईहुन गावी स्थायिक झालेल्या त्या मुलाची गोष्ट इतरांपेक्षा खूप वेगळी होती.. तो अभ्यासात मागे नव्हता पण त्याची पद्धत वेगळी होती. पण परीक्षार्थी घडवणाऱ्या या शिक्षणपद्धतीत पटपट आणि चटचट न बोलणारा मुलगा म्हणजे तसा कासवच ठरवला जातो. 

कसालच्या कुंभारवाडीतल्या शाळेत असाच परीक्षेचा प्रसंग त्या मुलाचे आयुष्य बदलून टाकणारा ठरला. त्या मुलांची शिक्षणातली प्रगती ही वेगळेपणाने गणित मांडल्यामुळे 'अप्रगत' शेरा मारणारी ठरली.. चौथीतला तो मुलगा भांडत होता की मी बरोबर आहे.. हा मुलगा मुंबईहुन गावी आला होता. त्यामुळे पटकन त्याच्या हुशारीवर 'फणसाची शेडं, आणि मुंबयची येडं' असा शेरा मारला..चौथीपर्यंत अजिबात मालवणी न समजणाऱ्या त्या मुलाला तो वर्गातला नर्मविनोद हा जिव्हारी टोमणा लागला.. त्याने तिथेच शपथ घेतली की पुढच्या सहा महिन्यात मी मालवणी शिकेन.. आणि आयुष्यभर फक्त मालवणीच बोलेन.. 

अप्रगत असा शेरा बसलेला तो मुलगा कृषी पदवीधर आहे. मुंबईच्या एका एनजीओसोबत संपूर्ण कोकणात जलसंधारणाचे काम करतो.. आणि ज्याला मालवणी येत नाही म्हणून हिणवले गेले होत ना त्याच मुलांनी काल कोण होणार करोडपतीच्या सेटवर जिथे चर्चा फक्त श्रीमंती, पैसा आणि लक्ष्मीची होती, त्याच मंचावर त्या मुलाने मालवणीच्या निमित्ताने सरस्वती पूजनाचा सोहळा मांडला हे अधोरेखितच होणार !

आज संपूर्ण कोकणात ज्या मुलाची मालवणी कविता वेगाने व्हायरल होतेय त्या मुलाचे नाव आहे दिलीप शिरसाट.. जन्मदाखल्यावर जन्मस्थळ मुंबई एवढी फक्त शहरी खूण असलेला हा मुलगा बोलीने, संस्काराने पक्का गाववाला आहे..दिलीप शिरसाट या नावाने जग त्याला ओळखत असेल, पण त्याला स्वतःलाच कधी ओळख द्यायची असेल तर तो स्वतःला हाक मारतो, ओ पिंटू शिरसाट !

कणकवलीच्या दारीस्ते गावातला दिलीप शिरसाट आज हॉटसीटवर बसूनही त्याच्या मालवणीमुळे जास्त चर्चेत आलाय.

दिलीप शिरसाटची अरे मेल्या पावसा ही त्याची स्वरचित मालवणी कविता आहे. त्या कवितेतून दिलीपने उभा केलेला पाऊस हा मालवणी मुलुखातला अस्सल पाऊस आहे..तो शास्त्रशुद्ध , मोजून मापून असा अजिबात नाहीय.. तो थेट दिसत नाही पण नजरेसमोर ओघळून भिजवतो, आणि सुक्या असलेल्या माणसांना पाण्याचा आवाज आणि अंधारातला रंग उलगडून दाखवतो 

अरे मेल्या पावसा .....

अरे मेल्या पावसा,
नको रात्रीचो असो पडा..
तुझ्या संगतीच्या त्या वारयान 
हालवत गदागदा परसुवातली झाडा ..

कडाम कुडुम धडाम करीत,
 तुझी म्हातारी ईलीं..
भेदरलेल्या लहान पोरांचे,
 फोटो काढून घेऊन गेली...
 
पाष्टाक फुटलो नळो,
 मेल्या वळयत झाली चिखल ..
केलल्या जमनीची वाट लावलस,
घरात झाली नसती दलदल ..

गडगडाटान तझ्या फ्युज उडावलो
शोधता तांब्याची तार आता धनी ..
आणि चिन मिन अंधारात 
रातकिडे गावक लागले,
टिरटिर करीत भयाण गाणी ..

आजीबायन हळूच टेमलो पेटवल्यान,
पण सरला तेच्यातला त्याल 
सुन लागली चरफडाक म्हणता,
"आसताला खयसुन रॉकेल,
 मेली थेरडी रोज जाळता धगाक,
चुलीत ओतुन भरपूर खूशाल" ..

आजीयेक इलो तेरम,
आजीयेन कडाकडा बोटा मोडल्यान..
आणि कावळ्याच्या शापान गाय नाय मरत म्हणत,
सूनेनव त्वांड ठसक्यात मुरडल्यान...

कंदिलाच्या उजेडात झेपात तेव्ह्डो,
अभ्यासाचो बुक्को पोरांनी पाड्ल्यांनी..
आणि गरमागरम पिटये बरोबरचे तांदळातले खडे,
हसत हसत गळयाखाली धाड्ल्यांनी...

थंडगार सुटलो वारो,
मेल्या लावलस ह्यो नसतो चिरचीराट..
व्हाळाक जावचे वांदे झाले,
होता पोटात अजब कुरबराट...

घरात झालो बायोग्यास सुरु,
कोणतरी हळूच पादला..
बहुतेक मगाशी पिटये बरोबरचा,
दुपारचा सूकाट तेका बादला...

कसोबसो ओवो खाउन,
हवेतली धुळवड मिटवली ..
आणि 
अंधाराक गाळी घालता घालता,
बापाशीच्या कुशीत हळूच मान टेकवली..

वाढणारया रात्री बरोबर रंगल्यो,
बाबांच्यो आठवणीतल्यो गजाली..
आणि
लहान पाखरांबरोबर झोपासाठी,
हळूच कंदीलातली ज्योतव इझाली ...

राग नको मानु पावसा,
तु असोच हळुवार रात्रीचो पडत रव...
पण ...
आठवणीन प्रेमानंदाचे प्रसंग,
नेहमीच आयूष्यात धाडीत रव....

दिलीपच्या या कवितेला मंच पहिल्यांदा मिळत असला तरी या अगोदर कणकवलीच्या गंधर्व प्रकाशनने त्याला मिळवून दिलेली दाद ही सुखावह होती. कुकारो या काव्यसंग्रहात त्याची ही कविता वाचल्यावर अनेक रसिकांनी दिलीपच्या प्रतिभेला दाद दिली होती .


दिलीप हा एक मनस्वी कलावंत असा माणूस आहे..त्याचे मालवणी असणे त्याच्या संवादात , त्याच्या हेलात आहे, त्यापेक्षा त्याच्या लिखाणात आहे. त्याच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे तो उच्चार कविता आहे.. ती डोळ्यांनी वाचण्यापेक्षा मोठ्याने वाचावी आणि परत निसर्गाला द्यावी अशीच आहे. त्याची आणखी एक मालवणी कविता आहे
 

प्रेमाच्या झऱ्याचा पाणी

आज तेका एश्टी त बघलय,
नजरानजर झाली आणि क्षणभर गडबडलय,
माझी अशी अवस्था बघून ता खुदकन हसला,
आणि तेच्या गालावरच्या खळीत,
माका ता टिपराचां सुंदर चांदणा दिसला..

 माझ्याकडे अधूनमधून बगीत,
ता मैत्रिणीबरोबर मोठमोठ्यान बोलाक लागला,
आणि ता माझ्याकडेच बघता ह्या कळल्यावर,
माझ्या आंगार मुठ मुठ मास वाढाक लागला.. 

मी सुद्धा अधूनमधून तेच्याकडे बघायचय,
आणि माझ्या ह्या शॉर्ट टर्म मेमरी तून तेचा नाव शोधायचय,
मन माझा सारख्या सांगायचा,
मेल्या तू खयतरी बघलस ह्या पोरग्या,
आणि फाटकन आठावला मगें माका,
ह्या तर वाडीवरच्या सावतांचा ' सरग्या'..

 मध्येच माझ्याकडे बघल्यान,
आणि माझो मोबाईल व्हाजलो,
मोबाईल वर तेचोच मेसेज बघून,
क्षणभर माझ्या काळजाचो ठोकोच चुकलो.. 

माका सुद्धा वाटला, बहुतेक आता सुरू होतलो,
प्रेमाचो मॅटर..
पण शिरा पडली तेच्या तोंडार ती,
मेसेज मध्ये लिवल्यान,
“मेल्या पिंट्या किती रे सुकलस,
कायतरी जिवाक खायत जा”
युवर लव्हींग सिस्टर.. 

तेका होता एक ईचारूचा,
तो कोणीतरी माझो हातच धरल्यान,
आणि वशाड इली त्या कंडक्टर च्या तोंडावर ती,
तेनाव पटकन बेल मारल्यांन.. 

तेचो इलो स्टॉप ता वाडीवर उतारला,
आणि माझ्या मनातल्या प्रेमाच्या झऱ्याचा पाणी,
इनमिन दोन हातावरच सरला..
इनमिन दोन हातावरच सरला..

दिलीपच्या शब्दातले मालवणीपण सच्चाई सांगणारे आहे. म्हणून त्याची कविता एक स्वतंत्र गजाल असते. त्याचे सोशल मीडियावरचे मालवणी लिखाण , मालवणी फोटो हे सगळं म्हणजे पायपेटी आणि चकीवाल्याची जुगलबंदी असते.

प्रत्येक जण जगताना एक ध्येय घेऊन जगत असतो, कुणाला काहीतरी बनायचे असते, किंवा कुणाला काहीतरी ते मिळवायचे असते. पण मला पुढच्या सहा महिन्यात अस्सल मालवणी बोलायचे आहे ही पैज लावून सहा महिन्यात जिंकणे आणि जिंकल्यानंतर चालतच राहणे याला खरी शर्यत म्हणतात.. दिलीप शिरसाट फक्त हॉटसीट वर बसला नव्हता..तर तिथे बसून मालवणी बोलण्यासाठी तोधावत राहिला, शिकत राहिला, जमेल तशी मालवणी बोलत राहिला.. 

आज करोडपतीच्या सेटवर जाऊन त्याने किती रुपये मिळवले कोणालाच ठाऊक नाही पण तो जिंकलाय एवढंच सगळ्यांना पुरेसे आहे.. ध्येय नावाची गोष्ट जिंकण्यानंतरही चालतच असते.. पुन्हा पुन्हा जिंकणाऱ्या कासवासारखी !

©sindhudurg360°

(सर्व निसर्ग छायाचित्रे सौजन्यही pinkushirsat photo factory )

Post a Comment

6 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. First of all congratulations for winning.... And the poem which you have composed is really amazing I am also a konkankar from malvan katta, you really made us proud....

    One request to the page admin please share this comment to dilip shirsat.

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप आभारी आणि मनापासून धन्यवाद..

      हे आजवर सगळे मी शब्दांनी जोडलेल्या माणसांचे आशिर्वाद आणि प्रेरक विचार सोबत होते म्हणून एवढा शक्य झाला..
      नायतर मी इथे त्या रंगभूमीवर जाण्याआधी शून्य होतंय आणि आता सुद्धा तोच शून्य आसय..
      आता वाढला हा ता फक्त अपेक्षांचा ओझा माझ्या खांद्यावर..आणि सभोवताली निर्माण झालेला एक लहानसा प्रसिद्धीचा वलय..
      बुक दुसरा कायच नाय..

      पुन्हा एकदा मनापासून आभार
      ☺️🙏🏼🌴

      Delete
  2. दिलीप, तू करोडपतीच्या मंचावर आलास, जिंकलास, पण आमका तुझो एक मालवणी म्हणान खूप अभिमान आसा.

    ReplyDelete
  3. हा एपिसोड बघताना खुप अभिमान वाटत होता 😍 ..... त्याचा जीवनाकडे बघण्याचा सरळ साधा दृष्टिकोन जो सर्व मालवणी माणसाचा असतो पण तो अमलात फार थोडे लोक आणतात ..... दिलीप च कराव तेवढं कौतुक थोडच ☺️....कार्यक्रमाच्या सरतेशेवटी त्याने दाखवलेला समजुतदारपणा उत्तर बरोबर असताना पण त्याने थांबायचा घेतलेला निर्णय ..... मला खुप वाटल अरे हा करोडपती झाला असता पण म्हणतात ना जास्त हाव माणसाला खड्ड्यात घालते तेच त्याने केल नाही .... खुप शांतपणे आणि प्रत्येकवेळी मालवणी असल्याचा गर्व त्याने आम्हाला करून दिला ....लग्नाबद्दलच्या त्याच्या साध्या अपेक्षा , गावी राहून पण कस मजेत जगता येत , कविता सर्वच काही ऐकताना, पाहताना मला मात्र हॉटसिटवर बसल्याचा feel येत होता.... ऋषी दा तुझ्या लेखणीतुन अजून भारी वाटल ☺️

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आभारी आणि मनापासून धन्यवाद..
      खरा तर मी आपल्या मातीतून आजवर मिळवलेले अनुभव आणि त्यातून शिकलेली जगण्याची रीत सहज मांडत गेलंय बाकी दुसरा विशेष असा कायच नाय होता.
      त्यात करूनही आपल्या कोकणातले अडीअडचणी मी स्वतः अनुभवलय आणि तितकेच झेललय सुद्धा त्यामुळे ते पण सगळ्या जगापुढे मांडणा ह्या माका तितक्याच महत्वाचा वाटला..
      मी आजवर शब्दानं जोडलेल्या माणसांचे आणि त्या माणसांच्या सुंदर नात्यांचे आशिर्वाद माझ्या पाठीशी होते म्हणून ही झेप घेऊ शकलय..
      एकट्याक ह्या कधीच शक्य नाय होता..
      असेच आशिर्वाद आणि शुभेच्छा कायम माझ्या पाठीवर आवडीन ठेवा.. मी त्याच्या जिवावर आणखी पुढे जाण्यासाठी नक्कीच प्रयत्न करीन..
      आपलो नम्र
      पिंटू शिरसाट 😊🌴

      Delete