घरचे गोकुळ बनवणारा 'शेवगा'


कोकणात गोकुळ अष्टमीला आणि गौरीला हमखास प्रत्येकाच्या घरात शेवग्याची भाजी ,काळ्या वाटण्याची उसळ आणि भाकरी , घावणे, वडे असा बेत असतोच. आता हिच भाजी का असते ? हा प्रश्न  आपल्या सारख्या नवीन पिढीला पडतो. पण आपल्याकडील  खाद्यसंस्कृती इतकी जबरदस्त आहे, इतका बारीक विचार ह्या जुन्या माणसांनी केला आहे हे समजल्यावर मात्र ह्या संस्कृतीचा आपण घटक आहोत ह्याचा सार्थ अभिमान वाटतो. आपल्याकडे श्रावणात जास्तीत जास्त मांसाहार टाळला जातो.  'कोकणात गणपतीक फुल घातल्याशिवाय माशे चिकन खानत नाय' त्यामुळे प्रोटीन आणि कॅल्शिअम ची कमतरता शरीरात होते. मग अश्यावेळी ती कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याकडे शेवग्याची भाजी खाल्ली जाते.

उन्हाळ्याचे शेवटचे 15 दिवस आणि जून चे पाहिले 15 दिवस असा एक महिन्याचा जो कालावधी असतो त्याला 'ऋतुसंधिकाळ' असं म्हटले जाते. हा कालावधी स्वास्थ्याच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे ह्या कालावधीत येणाऱ्या रानभाज्या अवश्य खाव्यात.

या काळात शेवग्याची भाजी खाल्याने आतड्यांना उत्तेजन मिळून पोट साफ राहण्यास मदत होते. ह्या मॅजिक ट्री मध्ये अजून काय आहे ते पाहुयात. 

शेवग्याला 'Moringa' असे म्हणतात. मुळचे  भारतीय झाड कुठे ही लावा जगतंच. सतत हिरवरगार दिसणार ह्या शेवग्याच्या झाडाची पान फुलं नि शेंगा  सगळेच खूप पोषक आहेत. ह्याच पांढऱ्या फुलांचे नंतर शेंगांमध्ये रूपांतर होते. आणि प्रोटिनची भरपूर मात्रा शेवग्याच्या भाजीतुन मिळते. पण हे वाचून बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या असतील की, हे कसं काय ? कारण प्रोटीन म्हटलं की डोळ्यासमोर येत ते अंडे, चिकन, मासे, डाळी ! हो ना ?  पण ह्या शेवग्याच्या पाल्यात प्रोटीन असतं. 

कॅल्शिअम  आणि आयर्न  खनिजद्रव्य आणि व्हिटॅमिनचा  चांगला स्रोत असणारी ही भाजी अतिशय चविष्ट ही लागते . शेवग्याच्या पानांची पावडर ही खूप गुणकारी आहे कुपोषित मुले आणि माता याना ही पावडर दिली जाते कारण त्याच्या पानामध्ये stigmasterol , sitosterol , kampesterol नावाचे फायटोकेमिकल आहेत ज्यामुळे इस्ट्रोजेन वाढते आणि पर्यायी आई चे दुध वाढते आणि मुलं निरोगी राहते.


शेवग्याच्या शेंगांमध्ये ओलीक ऍसिड असते. तसेच व्हिटॅमिन c, व्हिटॅमिन A , व्हिटॅमिन B  आहे ज्यामुळे रक्त वाढते डोळ्यांचे वरचे  वर होणारे आजार,सर्दी खोकला viral इन्फेक्शन  कमी होण्यास मदत  होते आणि  रोगप्रतिकारक क्षमता ही वाढतें. ह्या सर्व व्हिटॅमिन सोबत खनिजद्रव्य सुद्धा आहेत शेंगांमध्ये  कॅल्शियम,  लोह,  झिंक, कॉपर,  मँगनीज, पोटॅशियम, मॅग्नेशियम ही सगळी खनिजद्रव्य आहेत जी केस वाढण्याकरिता त्वचा रोगांसाठी , हार्मोन्स साठी अत्यंत महत्वाची असतात. त्याचमुळे आपल्या शेवग्याला Anticancer, Antidibetic, असे ओळखले जाते.
शेवग्या मध्ये संत्र्या पेक्षाही जास्त व्हिटॅमिन c आहे 
गाजरापेक्षा जास्त व्हिटॅमिन  A आहे. दुधापेक्षा जास्त कॅल्शियम आहे. आणि केळ्यापेक्षा  जास्त पोटॅशियम आहे.

टीप : - ज्यांची रक्तातील पोटॅशियम ची पातळी वाढली आहे त्यांनी ही भाजी टाळावी. दररोज 40 ते 45 मी व्यायाम करावा

 लेखिका - आहारतज्ञ  डॉ. गार्गी गौरव ओरसकर
9420970023
Foodandbeyound23@gmail. com

Title photo credit - sanskruti gaonkar

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.