श्रावणी पौर्णिमा आणि राखीचे एक अतूट नाते आहे. विश्वासाच्या एका धाग्यापासून ते अगदी कॅडबरी सेलिब्रेशन पर्यंत बदललेल्या सणाच्या या रुपात राखी मात्र मराठी संस्कृतीशी आपले आपलं नातं घट्ट जोडून आहे.
रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या विधीमुळे श्रावण पौर्णिमेला मिळालेले एक नाव. ‘रक्षा’ या संस्कृत शब्दाचा ‘रक्षण’ असा अर्थ असून ‘राखी’ हे त्या शब्दाचेच मराठी रुपांतर होय. राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. ही राखी अक्षता, मोहऱ्या व सोने एकत्र बांधून तयार करतात. हळदीत भिजविलेला सुती दोराही राखी म्हणून वापरतात. हल्ली बाजारात तयार मिळणाऱ्या रंगीबेरंगी राख्या बांधल्या जातात. सकाळी स्नानानंतर देव, पितर व ऋषी यांना तर्पण करून दुपारी रक्षाबंधनाचा विधी करावा, असे शास्त्र आहे. भावाने आपले रक्षण करावे म्हणून बहीण राखी बांधते, अशी एक समजूत असली तरी सर्व संकटांपासून भावाचे रक्षण व्हावे, हा रक्षाबंधनामागचा प्रमुख हेतू आहे, असे दिसते. रक्षाबंधनामुळे सर्व अशुभांचा नाश होऊन जय, सुख, पुत्र, आरोग्य, धन इत्यादींची प्राप्ती होते आणि कोणाचाही जादूटोणा, मंत्रतंत्र वगैरे चालत नाही, अशी श्रद्धा आहे. राखी पौर्णिमेलाच ‘पोवती पौर्णिमा’ असेही म्हणतात. या दिवशी पवित्रारोपण म्हणजेच देवतांना पोवती अर्पण करून नंतर ती स्त्री-पुरुषांच्या हातावर बांधण्याचा विधी असतो. पोवते म्हणजे देवतेला वाहण्याचा पवित्र दोरा होय. रक्षाबंधन हे या विधीचेच रूपांतर असण्याची शक्यता आहे. पुराणकाळापासून बदलत आलेला हा रक्षेचा धागा नवनवे ट्रेंड सेट करतोय. बदललेल्या राखीत सध्या 'विकल्प' हा ब्रँड प्रचंड गाजतोय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या स. का. पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुबक इको-फ्रेंडली राख्यांची परदेशातील भारतीयांनाही भुरळ पडली आहे. नारळाच्या करवंटीपासून बनविलेल्या या राख्यांना परदेशात मागणी वाढल्याने राख्या जगभरातील देशांत पाठवल्या गेल्या आहेत. सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या पर्यावरण या विषयाचे प्राध्यापक हसन खान आणि त्यांचे विद्यार्थी विकल्प या ब्रँडखाली राख्या तयार करत आहेत.
निसर्ग हा सदैव मानवास मदत करण्यास उभा असतो. पण आपण फक्त त्याचा गैरवापर करतो. निसर्गावर आपण फार आघात केले आहेत की, स्वतःलाच संकटात टाकत आहोत. दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक वस्तू वापरतो की ज्या निसर्गावर आघात करतात, पर्यायाने त्याचा परिणाम आपल्याच जीवनावर होतो. अनेक वेळा आवाज ऐकायला मिळतो की, पर्यावरण घातक वस्तूंना पर्याय नाही म्हणून आम्ही त्या वस्तू वापरतो. याच मुद्द्याचा विचार करून प्रा. खान यांनी या आघात करणाऱ्या वस्तुंना पर्याय आणण्याचा विकल्प या हरित व्यवसायातून प्रयत्न केला आहे.
मुलांमध्ये अनेक सुप्त कलागुण आणि कौशल्य असतात. पण महाविद्यालयीन अभ्यासक्रमात हे बहरणे शक्य नसते. अशा कौशल्यपूर्ण प्रामाणिक मुलांचा शोध घेऊन, त्यांना प्रा. खान यांनी स्वतः प्रशिक्षण दिले आणि त्यांचे कौशल्य बहरून आणण्यासाठी सुरू केली हुनर की पाठशाळा. आज ते आणि त्यांची पत्नी अमरीन खान आणि नवनीत मेस्त्री, पायल शिरपूटे, मधुरा ओरसकर, अजय आळवे आदी मुले यामध्ये समाविष्ट आहेत.
या राख्या नारळाच्या करवंटीचा वापर करून निर्मिती केलेल्या आहेत. तर राख्यांमध्ये बिया म्हणजे रक्षाबंधन नंतर कुंडीमधून किंवा मातीखाली घातल्यावर काही दिवसात त्यामधून झाड येईल. (बिया फुलपाखरांचे नेक्टर प्लांटच्या आहेत) तर नारळाच्या झावळ्यापासून राखीसाठी इको पॅकिंग बॉक्स करण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामधून या राख्यांना मागणी असून गोवा, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांसोबत लंडन मध्येही राख्या पाठविण्यात आल्या आहेत. राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या आणि सुव्यवस्था राखणाऱ्या सैनिकांना, आर्मी चीफ, राष्ट्रपती आणि गव्हर्नर यांना देखील या राख्या विकल्पने पाठविल्या आहेत असे प्रा. खान यांनी सांगितले.
विकल्प हा अनेक दृष्टीने एक शाश्वत मार्ग बनलाय. लॉकडावूनच्या काळात स्वयंरोजगार, पर्यटन, पर्यावरण समृद्ध आणि कल्पवृक्षाचा आणखी एक सक्षम प्रबोधनात्मक वापर करण्यात 'विकल्प'ने आदर्श निर्माण केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ मोठ्या प्रमाणात परंतु त्याच्या करवट्यांचा योग्य वापर केला जात नव्हता. चुलीमधील इंधन म्हणूनच जास्त वापर होतो. याचा विचार करून विकल्पने आठ रुपये प्रति किलोने घेऊन लोकांच्या चुलीमधून करवंट्या बाहेर काढल्या. करवंटीतून अनेक हरित वस्तूंची निर्मिती केली आहे. यातून कार्बन फुटप्रिंट तर कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्लास्टिकला पर्यायी वस्तू देखील लोकांपर्यंत पोहोचतील हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे. निसर्गाच्या अस्तित्वावर, आपले अस्तित्व अवलंबून आहे. पण प्लास्टीकच्या विळख्यात आपण स्वतःला अडकून ठेवले आहे. प्लास्टिकला पर्याय शोधणे ही विकल्पची प्राथमिकता आहे. विकल्पच्या करवंटी राखी आज केवळ पर्याय नाही तर कोकणाचा नवा ट्रेंड बनतायत हे मात्र नक्की !
Vikalp
+91 82753 90652
Vikalpeco09@gmail.com
Bhariiii
ReplyDelete