फिटे अंधाराचे जाळे

साधारणपणे बरोबर एक वर्षांपूर्वी याच दरम्यान त्याच्या येण्याची चाहूल लागली होती. आणि आज वर्षभरानंतर त्याच्या असण्याची सवय झालीय. हा जो वर्षभराचा प्रवास आहे ना त्यात कोरोना नावाच्या विषाणूसोबत माझ्या लाल मातीमधल्या माणसाच्या अंगात नव्याने वाढलेली जी कोकणी माणसाची अँटीबॉडी तयार आहे ना त्याबद्दलचा हा लेखप्रपंच आहे.

मुळात  गावाकडे सुखाने जगणारा , मुंबईत फक्त नोकरीच्या मागे घड्याळासोबत धावणारा , आणि निवृत्तीनंतर कसलीही ददात नसणारा अशा साहित्यिक व्यक्तिचित्रणातून रेखाटलेला जो कोकणी माणूस आहे त्याला त्याच्यात प्रतिमेतून बाहेर काढणारा जर कुठला काळ असेल तर हा काळ म्हणजे हा कोरोना काळ असे मी नक्की म्हणेन. मागच्या वर्षभरात वेशीवरुन माझे गाव पाहताना आणि त्याचवेळी मुंबईतला कोकणी माणूस पाहताना मला पहिल्यांदाच जे आर्थिक आणि सामाजिक अभिसरण झालंय त्यातून बदललेल्या एका नव्या मानसिकतेची वाट दिसतेय.

आर्थिक, सांस्कृतिक, आणि एकूणच अशा तीन टप्प्यातून जेव्हा मी चाकरमानी पाहतो तेव्हा मला त्याच्या सेकंड इन्कमबद्दल जागृत झालेल्या जाणिवा दिसतात, करियर फोकस लाईफ याला आता महानगरांची गरज उरली नसल्याचे दिसतय, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे धावत्या शहरातला डिस्टर्बन्स त्याला पुन्हा गावाकडे ओढतोय. या सगळ्यात पुन्हा गावाकडे चला, आपल्या कोकणचा विकास आपण करूया असले काही फार मोठे समाज प्रबोधनात्मक नाही आहे, तर साधा सरळ विचार आहे की होय मला कम्फर्टनेस हवाय जो मला आता पैशापेक्षाही जास्त मिळेल.

मुंबईतल्या नव्या आत्मनिर्भर चळवळीच्या उल्लेखात मी काही गोष्टींचा विशेष उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. सुवर्ण कोकणच्या सतीश परब यांनी लॉकडावूनमध्ये घरी बसलेल्या चाकरमान्याला 'तुमचे घर हेच तुमचे नवे हेडक्वार्टर' हे सुचवून एप्रिल ते जुलै सलग फेसबुक लाईव्ह सेमिनार केले आणि त्यातून आजपर्यंत न दिसलेली घरची श्रीमंती नव्याने उलगडत गेली. मसाला आणि किराणा या वस्तूतुन केवळ डी मार्ट नाही तर आपणही फार नाही पण श्रीमंत होऊ शकतो हा विश्वास मिळाला. 

ग्लोबल कोकणचे संजय यादवराव, काथ्या महामंडळाचे सुनील देसाई यांच्यासारख्या दिग्गज वक्त्यांनी जो उद्योजकीय जागर सुरु केला त्या सगळ्याला झुम, फेसबुक, इंस्टा लाईव्ह, गुगल डुओ अशा माध्यमातून एक वेगळं माध्यम मिळालं. सोशल मीडियाचा मागच्या वर्षात जर जगभरात प्रभावीपणे कोणी वापर केलाय तर मुंबईपासून  सिंधुदुर्ग पर्यंत पसरलेल्या कोकणी माणसाने !

सोशल मीडियाचा वापर करून नवनवे मालवणी ब्रँड तयार झाले. मुळात नोकरी ही मानसिकता तयार झाली. मसाले, तांदूळ, लाडू या भेटवस्तू नाहीत तर ती उदिमाची साधन असू शकतात हा एवढी वर्ष ओरडूनही समजला नाही तो बदल एका वर्षात झाला. मालवणी घरगुती जेवण संस्कृती आणि त्याचे अर्थकारण आता झोमेटो, स्वीगी, उबेर इट्स, फूड पांडा या फूड डिलिव्हर सर्व्हिसेसवर रिफ्लेक्ट झालाय.

सगळ्यात मोठा जागर झाला असेल तर तो कोकणच्या आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांकृतिक विश्वात. मुंबईत मागच्या काही वर्षात गावाकडून मुंबईत देहाने स्थायिक झालेली नवी पिढी आहे. जी मंडळी देहाने मुंबईत असतात मनानं कायम गावात पडीक असतात. त्यांच्या सोशल मीडियावरही मुंबईतील श्रीमंत ठिकाणे नसतात तर गावची लोकेशन असतात. आणि या सगळ्यांनी गावपण नव्याने उलगडलं. 

ठप्प झालेल्या अर्थकारणात ज्याला फक्त चाकरमानी जगणारा म्हणून आपण पाहिलं ना तो आता बदललाय. अर्थात या सगळ्या बदलात ना कुठली राजकीय चळवळ होती ना सामाजिक चळवळ होती. त्याच्या या बदलात त्याला सोशल मीडियाने त्याला जागं केलं.

प्रत्येक मालवणी माणसाने नात्यातला, गावातल्या आणि जगण्यातला गोड कडवट क्षणांचे अनुभव घेतलेत. त्याला आता कसलीच फिकीर नाहीय. गणपतीला गावी न जाण्याचे दुःख सहन करणारा माणूस आता कुठल्याच दुःखाची तमा नाही बाळगत, ना गावकीचे ना भावकीचे ! फक्त आता जगण्याचा फोकस क्लिअर झालाय. त्याची कनेक्टिव्हिटी आता क्लिस्टर क्लिअर झालीय.. अगदी लेखाच्या शीर्षकाची पुढची ओळ झालीय.. फिटे अंधाराचे जाळे !

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.