समजणे, उमजणे आणि कळणे !

बोली साहित्यात सामाजिक संवेदना कवीला प्रकर्षाने धारदार बनवतो. मालवणी बोलीतील कवी हा नेहमीच आपल्या पेनासोबत सगळा निसर्ग घेऊन फिरत असतो. हा निसर्ग कोसळणाऱ्या पावसाचा असतो तसा तो उन्हाच्या झळा मांडणाऱ्या डोंगराचाही असतो..पण आता याच कवीचा प्रेरणास्त्रोत असणारा निसर्ग आता अस्वस्थ झालाय..तो स्वतः टाहो फोडतोय.. आणि याच टाहोचा आवाज काही कवितेत शब्दबद्ध झालाय.

सावंतवाडी दोडामार्ग परिसरात सुरु असलेल्या मायनिंग उत्खननाचा दुष्परिणाम आता कळणेसह आजूबाजूच्या सर्वच गावपरिसराना सहन कराव्या लागतायात. विकासाच्या नावाखाली अनधिकृत उत्खनन यामुळे जी एक पर्यावरणीय संरचना बदलून गेलीय त्यावर आता भाष्य करण्याची वेळ आलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिग्गज मान्यवर कवितांच्या या तीन कविता याच अस्वस्थतेचा एल्गार उभा करतायत.

परत.... परत... परत...

परत जमनी इकतलव
परत डोंगर फोडतलव
परत झाडा तोडतलव
परत भराव वततलव

परत मायनिंग करतलव
जेसीबी क्रशर लावतलव
डंपर भरधाव पळवतलव
डोंगराक उजाड करतलव

विनाशकारी उद्योग येतले
जबरदस्तीन हय लादतले
नदी, तळी दुषीत करतले
निसर्गाच्या जीवार उठतले

परत पावस पडतलो
परत पूर येतलो
नेते बघुन जातले
पंचनामे करतले

परत दरड कोसाळतली
परत माणसा मरतली
परत गावा गाडतली
परत दुनया रडतली...

सगळा परत परत होतला
पण आमी सुधराचव नाय
आमी माती खातलवच
परत परत परत....
- जयंत रेवडेकर

(मालवणी शब्दार्थ - इकतलव - विकणार, वततलव- ओतणार)
प्रख्यात कवी जयंत रेवडेकर यांनी मालवणी बोलीतून निसर्गाच्या या रौद्ररुपाला आणि त्या भयावहतेला शब्दबद्ध केलंय. मालवणी शब्दाचा प्रभावी वापर आणि अचूक मर्मभेद हे रेवडेकर यांच्या कवितेचे वैशिष्ट्य मानले जाते

मोहन होडावडेकर हे देखील पर्यावरण आणि मालवणी बोलीच्या साहित्यिक चळवळीतील एक मोठे नाव आहे. लचके तोडता मायनिंगची धार या कवितेतून त्यांनी मांडलेली डोंगररांगाची व्यथा चिंतनीय आहे
लचके तोडता मायनिंगची घार

लचके तोडता मायनिंगची घार
मुस्काट दाबून बुक्याचो मार।

मायनिंगान लायली दारात कार
पुढारी पडले गपगार
विकास झालो थोड्यांचो फार
भकास झालो गावाचो दार

पोखरून काढला आतडा भायर
उभ्या डोंगरांन खाल्ली हाय।

मेंदू तेचो कोमात गेलो
पायात भरला कापरा
शेगानशेग आडवो पडलो
फुटली दोनय ढोपरा।

पावसानं त्येका तिरडेर घातलो
फरफटत नेवन चितेर लोटलो।
झाडा पेडा गुरा ढोरां
माणसांचो गुठलो गाडुक गावलो

नियतीच्या तागडेक मापटा वेगळा
सरसकट मेजूचा गणित आगळा।

कर्मा कोणाची भोग कोणार
पाप कोणचा खापर कोणार।
गोडवे आमी तेंचे गाणार।
आग लागांदे तुमच्या तोंडार।
- मोहन होडावडेकर

( मालवणी शब्दार्थ:मुस्काट-तोंड, बुक्क्याचो- ठोसा, हाय खाणे-धसका घेणे, कापरा-कंप, शेगानशेग-अक्षरशः गुठलो-गाठोडे, मापटा-वजनमाप, मेजूचा-मोजण्याचा,/खापर-दोष )


निसर्ग हा बोलीत आणि बोली जगण्यात उतरते. मायनिंगचा विषय हा केवळ कळणे दोडामार्ग सावंतवाडी एवढ्या पुरताच मर्यादित नसून आता त्याबद्दल पर्यावरणीय ठामपण घेण्याची गरज आहे. शिरोड्याचा कवी स्वप्नील वेंगुर्लेकर याच मायनिंगच्या विनाशाबद्दल बोलताना कवी म्हणून नाही तर भूमिपुत्र म्हणून मायनिंग कवितेतून कालपासून उद्यापर्यंतची गोष्ट सांगतो
मायनिंग

विकासाच्या नावाखाली..
सुरू झाला "मायनिंग"..
पुढारी घेतत क्रेडिट..
मारतत भलताच "शायनिंग"..

मायनिंगान धरलो जोर..
पैसो लागलो खेळाक..
हौस-मौज भागवची..
गणिता लागली जुळाक..

प्रत्येकाच्या दारात..
इलो नवो डम्पर..
ज्याका त्येका मायनिंगाची..
लाॅटरीच लागली बम्पर..

मायनिंग गेला वाढत..
तशी झाडा लाल झाली..
रस्त्याक पडले होंडके..
त्येका कोनच नाय वाली..

मायनिंगान कापून केल्यान..
डोंगर बोडको-भकास ..
आता वाटाक लागला..
ह्यो कर्माचो विकास..

जमीनीभितर खनान खनान..
कायच -हवला नाय..
पाणी गेला आटान..
कोरडी पडली बाय..

-हास जाता निसर्गाचो..
म्हणान मायनिंग आता बंद..
डम्पर उभे जाग्यार ..
कशे पुरवया छंद..

पैशासाठी ओरबाडतत..
सुक्यासोबत ओला..
निसर्गाचो -हास करून..
कोनचा झाला भला...??
- स्वप्निल वेंगुर्लेकर, 

(मालवणी शब्दार्थ  : होंडके - ओंडके, खनान खनान - खणून खणून)
 
कळणेच्या निमित्ताने आता केवळ हा परिसरच नाही तर सगळा प्रांतच मायनिंग, वृक्षतोड, मायनिंग या सारख्या पर्यावरणाला धक्का पोहोचवणाऱ्या विषयांवरून संवेदनशील झालाय.  म्हणूनच मायनिंगच्या या तीन कविता आजचे समाजमन अधोरेखित करण्यास गरजेचे बनतात..

(सर्व छायाचित्रे कळणे गावची आहेत.. काही कालची 
आणि काही खूप कालची... )


Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. कवींच्या प्रतीभेपुढे मायनिंगच्या कर्त्या करवित्याना लाज वाटेल शरम वाटेल
    तर शप्पथ....

    ReplyDelete
  2. वेळ आपण आणली आता चित्र चित्र बदलण्याची वेळ आली.

    ReplyDelete
  3. स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा बळी घेणे.

    ReplyDelete