रियाजी 'आलापाची' भैरवी होताना...

टोकियो ऑलिम्पिक मध्ये सलामीलाच आनंदाचा क्षण पाहण्याचे भाग्य हिंदुस्थानला मिळाले आहे आणि याला कारण ठरलंय मीराबाईचा अतुलनीय पराक्रम ! आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये दुसरा क्रमांक पटकावत भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे. मीराबाई चानूने ही कमाल 49 किलोग्राम महिला वर्गात केली आहे. तिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे. 

मीराबाईने स्नॅच राउंडमध्ये 87 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलत हे यश मिळवलं. मीराबाईच्या या यशाबरोबर आणखी एका मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा डंका आज विशेषत्वाने गाजतोय तो म्हणजे 'डॉक्टर आलाप जावडेकर'.

यशातला  फिजीओथेरपिस्टचा वाटा 

डॉक्टर आलाप जावडेकर हा मिराबाईचा चानूचा फिजीओथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहे. खेळ आणि फिजीओथेरपिस्टचे नाते नेमकं काय हे क्रिकेटमुळे क्रीडा प्रेक्षकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. पण वेटलिफ्टिंग सारख्या खेळात फिजीओथेरपिस्टही संकल्पना म्हणजे खेळाडूसोबत जगत असलेला दुसरा देह या एवढ्या शब्दात आपण समजवून घेतलं तर त्याची खेळ या प्रकारातील वैश्विकता समजेल.
 

वेटलिफ्टिंगच्या  या खेळात वजन उचलणे या प्रकाराशी थेट स्नायू आणि शरीराशी संबंध येत असल्याने दुखापत होण्याच्या सुरुवातीनेच हा खेळ सुरू होतो. अशा या खेळात फिजीयोथेरपिस्ट असणे हा प्रचंड गरजेचंच असते..विशेषतः विजयी खेळाडूच्या रणनीतीला त्याच्या शारीरिक बळकटीकडे लक्ष देत शेवटच्या क्षणी विजयी पताका रोवण्याचा गेमप्लॅन हा फिजीयोथेरपिस्टकडेहो पक्का आखलेला असतो.

आलाप आपल्या जवळचा कसा ?

 ऑलिम्पिक २०२१ मध्ये पहिल्याच दिवशी भारताच्या मीराबाई चानू हिने वेट लिफ्टिंग प्रकारात रौप्य पदक मिळवून दिल्यानंतर साऱ्या भारतीयांची मान उंचावली असतानाच या मीराबाई चानू हिचा फिजिओथेरपिस्ट  म्हणून काम पाहणारे श्री. आलाप योगेंद्र जावडेकर हे मालवणच्या स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जावडेकर आणि मालवणच्या भंडारी हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका ललिता जावडेकर यांचा नातू तसेच भंडारी हायस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ. योगेंद्र जावडेकर यांचे सुपुत्र आहेत. 


जपान टोकियो येथे ऑलिम्पिक २०२१ स्पर्धा सुरू झाली असून ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने पहिल्याच दिवशी मीराबाई चानू यांच्या रूपाने  वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविल्याने साऱ्या भारतीयांनी खेळाडू चानू हिच्या बरोबरच तिला मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक टीम वर कौतुकांचा वर्षाव केला . आलाप जावडेकर हे आपल्या कुटुंबा समवेत अनेकवेळा मालवणला आले असून मालवण हे त्यांचे  आवडते ठिकाण आहे. 


आलाप जावडेकर हे पटीयाला पंजाब येथे ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट याठिकाणी अधिकृत फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत असून ३१ वर्षीय आलाप यांनी तळेगाव पुणे येथे बॅचलर ऑफ फिजिओ थेरपिस्ट म्हणून पदवी संपादन केली त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया मध्ये फिजिओथेरपिस्टचा एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. मीराबाई चानू यांना ऑलिम्पिकच्या दृष्टीने आलाप जावडेकर यांनी पटीयाला येथे काही महिने मार्गदर्शन केले असून अमेरिकेतही चानू यांना फिजिओचे धडे दिले होते . 

थोडेसे फिजीयोथेरपीबद्दल..

फिजिओथेरपी. अर्थात आपल्या शरीरातील एखाद्या दुखावलेल्या अंगास, स्नायूस, हाडास पुन्हा पूर्ववत करणे. व्यायाम आणि फिजिओथेरपी हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत.फिजिओथेरपी म्हणजे रुग्णांसोबत मित्रत्वाने राहून त्यांच्या रोगावर योग्य निदान करून त्यांना लवकर बरे करण्यात मदत करणे होय. व्याधीचे मूळ कारण शोधून काढून व्यायामाची शास्त्रीय पद्धतीने जोड देऊन दुखण्यावर मात करण्याची किमया फिजिओथेरपीमध्ये असते..
फिजीओथेरपी म्हणजे भौतिक उपचार शास्त्र. फिजीओथेरपिस्ट बाबत अनेक जण गल्लत करतात. फिजिओथेरपिस्ट म्हणजे जिम ट्रेनर, योगा ट्रेनर किंवा फिटनेस ट्रेनर असे सोयीस्कर अर्थ लावून मोकळे होतात. फिजिओथेरपी ही सुद्धा एक एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी यासोबतच वैद्यकीय विभागाची एक शाखा असून त्याचे रीतसर शिक्षण घ्यावे लागते. त्यानंतर मग बॅचलर आणि मास्टर अशा डिग्रीसोबत उच्च शिक्षणाच्या वाटा आणखी प्रगल्भ होत जातात 

आज मीराबाई चानूच्या यशाने हिंदुस्थानचा आनंद द्विगुणित झालाय..पण आलाप सारख्या सिंधुदुर्ग जिल्ह्याशी नाते सांगणाऱ्या फिजीओथेरपिस्टमुळे या वेगळ्या वाटेवरचे शैक्षणिक प्रवाह आता चर्चेत आलेयत! शेवटी यशातला आपलेपणा हा आपल्या माणसामुळे जास्त वेळ लक्षात राहतो. जाता जाता आलापचे अभिनंदन आपल्यासाठी का महत्वाचे आहे तेही सांगतो, "A physiotherapist has brain of scientist, the heart of humanist and the  hands of an artist"

डॉक्टर आलाप यांच्या या क्षेत्रातल्या रियाजाची ही सुंदर तान आहे, ही मैफल अशीच रंगत राहो याच शुभेच्छा !

©sindhudurg360

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. अभिनंदन डाक्टर साहेब

    ReplyDelete