सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुरु परंपरा आणि श्री गुरु व्यास मुनी मंदिर


 देवभूमी असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मातीच्या कणाकणात देवदेवतांचे अस्तित्व असल्याचा समज या संस्कृतीला श्रद्धावान आणि कर्मशील बनवतोय. देवदेवता आणि संतसज्जनांची या पुण्यभूमीशी नाते सांगताना या पुण्यप्रांताला 'दक्षिण काशी' म्हणण्याचा मोह टाळणे फार अवघड होते.

तुम्ही ज्याला वर्तमान समजता तो वास्तवात अंधकार आहे, आणि ज्याला अंधकार समजून बघणे टाळता त्याच ठिकाणी जगणे तुमची नव्याने वाट पाहत असते. या ओळीचा प्रत्यय देणारी अनेक विचारस्त्रोत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. दाणोलीचे श्री साटम महाराज, पिंगुळीचे श्री राऊळ महाराज, कणकवलीचे श्री भालचंद्र महाराज, वेंगुर्ल्याचे श्री आनंदनाथ महाराज  आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या  आकाशगंगेत असणारे माणगावचे श्री टेंबे स्वामी महाराज यांची नाव तुम्हाला पुन्हा स्वतःकडे नेईल. साक्षात ज्ञानभूमी बनवणारी ही अवतारलीला त्या पुण्यपावन क्षेत्राकडे जाताना, आपण आपल्या नावापुढे 'सिंधुदुर्ग' जिल्ह्याचे नाव अभिमानाने मिरवायला किती भाग्यवान आहोत याची जाणीव करुन देणारी आहे. 

ज्या सिंधुदुर्गात शिर्डीच्या अगोदर देशातील पहिले साई मंदिर होते म्हणजे ही भूमी फक्त गुरुपीठच असणार ना! सिंधुदुर्ग जिल्ह्याची धर्मसंस्कृती ही केवळ 'व्हय म्हाराजा' आणि 'गणपती बाप्पा मोरया' एवढीच सीमित नाहीय. धर्मशास्त्र, आत्मशोध आणि चिदानंदाकडे नेणारा तो गुरुप्रवास आहे. फक्त एकदा या समस्त गुरुजनांना आत्मशोधाचे विज्ञान म्हणून शिकले पाहिजे. आणि हे जेव्हा समजेल तेव्हा समाधीपीठ ही ऊर्जापीठ बनतील !

आषाढ पौर्णिमा हा दिवस जसा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतात तसाच तो व्यासपौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो. गुरुपूजनाची परंपरा असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री व्यास मुनींचेही एक पूजनपीठ आहे.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासपूजाही केली जाते. महर्षी गुरुदेव व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार म्हणून ओळखले जातात. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केल्याचं म्हटलं जातं.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला व्यासमुनींना वंदन करता यावे, यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील खानोली-सुरंगपाणी येथील विठ्ठल पंचायतनामध्ये व्यास मुनींच्या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. हे व्यासांचे देशातील आठवे, महाराष्ट्रातील दुसरे, तर जिल्ह्यातील पहिले मंदिर आहे.

परंपरागत उल्लेखांनुसार अनेक ग्रंथांचे कर्ते म्हणून व्यास प्रसिद्ध आहेत. त्यांनी वेदांचे विभाजन व वर्गीकरण केले म्हणून त्यांना ‘वेदव्यास’ म्हणतात. व्यास मुनी हे अनेक ग्रंथाचे कर्ते मानले जातात. महाभारत लिहिणारे व्यास मुनींनी व्यासशिक्षा,ब्रह्मसूत्रे, महाभारत, पुराणे, व्यासभाष्य अशा अलौकिक ग्रंथरचना केल्या आहेत

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.