चल रे लक्ष्या गावाला !

पुर्वीचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे कोकण असे संबोधले जायचे. त्याला तीनं तपे उलटून गेली. सन १९८४ मध्ये प्रशासकीय दृष्ट्या सर्वार्थाने दक्षिण कोकणातील जनतेला सोयीचे व्हावे  म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण होवून ३६ वर्षे  झाली असतील. पण उद्योग व्यवसायातला सिंधुदुर्ग अजूनही शोधण्याचीच वेळ का येतेय ?

मुंबई महानगराला कुशल,अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा व्हावा म्हणून तेथील खाजगी कारखाने,शासकीय कार्यालये व इतर कामांसाठी दक्षिण कोकणातून १० पर्यंत किमान शिक्षण झालेला पोरगा, किंवा पोरगी मुंबई ते अथवा जिथं आपले नातेवाईक असतील त्या महानगरात जायचे पडेल ते काम, मिळेल ती नोकरी करायचे.  स्वतः:च्या जन्मजात गुणांचा विकास जिगरी वृत्तीने तेथील परिस्थितीनुरुप करुन स्वतःला विकसित करायचे ते औद्योगिक कारखान्यातील रोजगार असू द्या अथवा शासनाच्या विविध विभागांतील नोकरी असू द्या...थोडीशी कौटुंबिक आर्थिक स्थिरता येताच जन्मजात चळवळ्या असणारा कोकणी माणूस स्वाभिमान वाढवत पुढाकार घेवून इतरांच्या अडचणी आपल्या आहेत म्हणून सोडवण्याचा प्रयत्न करायचा.  या त्यांच्या अंगभूत गुणांनी दक्षिण कोकणातील विशेषत: आताच्या सिंधुदुर्ग जिल्हयातील भूमीपुत्र तेव्हाही मागे नव्हते. मग ते क्षेत्र औद्योगिक असू द्या, सामाजिक, राजकीय वा आर्थीक असू द्या त्यात सिंधुदुर्ग भुमी पुत्र आघाडीवर असायचा.. आजही आहे.आपले सर्वस्व पणाला लावून मिळालेल्या संधीचे सोने केलेली अनेक व्यक्ती आपणास  दिसतील....

जिल्हा विभाजनानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा विकास व्हावा म्हणून अनेक सामाजिक,राजकीय,आर्थीक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आपले योगदान दिले आहे.त्यात त्रिसूत्रातून विकास करायचा असा विचार असेल किंवा अन्य विकासात्मक द्दष्टीकोनातून असेल फवत एकच लक्षात घ्या बाहेरचे येवून येथील विकास होईल,आपणास रोजगार उपलब्ध होईल अशा भ्रमात राहून चालणार नाही.आपणासच आपला विकास करावा लागेल त्यासाठी इतरांचे सहकार्य घेण्यास कमीपणा मानता कामा नये. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, जिल्ह्यातील स्थानिक उपलब्ध साधनसंपत्ती यांचा पुरेसा वापर आजही औद्योगिकीकरण होण्यास झालेला नाही. उद्योजकता वाढीस आवश्यक असणारे सर्व गुण जन्मजात येथल्या भुमीपुत्रामध्ये आहेत. मात्र या गुणांचा वापर मोठ्या मल्टी नॅशनल औद्योगिक कंपन्यांचा प्रशासकीय प्रमुख होण्यात झाले असेल.अर्थात हे उपजत बुद्धीमत्तेच्या आधारावर..  अर्थात याच कारण आजही जे पुर्वी होतं तेच आहे,  "बाबा रे ,बेबी तू खूप शिक व नोकरी ला कुठं ही चिकट "अर्थात हे संस्कार त्या कालावधीत योग्य होते.आज जग विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अति प्रगत होत आहेत त्या वेळी आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे.मी या जिल्ह्यातच राहणार,येथील नैसर्गिक साधनसंपत्तीवर, कृषीवर उद्योग करणार व नोकरी देणारा होणार.....

सिंधुदुर्ग जिल्ह्याला अरबी समुद्र लाभलाय. गोड्या पाण्याच्या नद्या आहेत,काही ठिकाणी पुराण कालावधी पासूनचे तलाव आहेत तसेच काही नैसर्गिक,तर कृत्रिम तलाव आहेत याचा विचार केला तर मस्योदयोगावर आधारीत खा-या,गोड्या पाण्यातील मत्स्यशेती व अनुषंगिक कितीतरी व्यवसाय सुरु करता येतील..

सिंधुदुर्ग म्हणजे जागतिक पातळीवर स्पर्धक नसलेल्या फळांचाच प्रदेश.. माणसाला आवश्यक असणारी जीवनसत्वे, औषधे ही या पाण्यात आहेत तशीच येथल्या मातीत , नैसर्गिक संपत्तीत आहेत. फळफळावळीत ,नैसर्गिक झाड झुडपात आहेत..  येथील शेती, बागायतीत आहे. यांच्यावर प्रक्रिया केल्यास स्वत: रोजगार मिळेलच,  पण इतरांच्या रोजगाराचा प्रश्न सुटून गावच्या गावं अशा छोटेखानी वस्तू निर्मीतीतून उद्योगाचे हब निर्माण होवू शकतील एवढी ताकद क्षमता या नैसर्गिक साधनसंपत्ती या जिल्हया मध्ये आहे.

किना-यावर ची वाळू ती लाल माती,काळे कातळ  यातूनही प्रबळ इच्छा निर्मितीतून पैसा निर्माण करता येईल. येथील किनारे, सिन सिनेरी नैसर्गिक ठिकाणे, ऐतिहासिक वारसा लाभलेले गड किल्ले, गढी,पुरातन लेणी,  डोंगर यातून ग्राम पर्यटन ते फाईव्ह स्टार, डिलक्स सेवा, पर्यटन विषयक मौज मजेपासुन हेल्थ डेव्हलपमेट पर्यंत अनेक छोटे ते मोठया सेवा पर्यटकांना उपलब्ध करता येतील. अनेक टाकावू पासून टिकाऊ वस्तू निर्मीती करुन गृह उद्योग ते इंडस्ट्रीयल प्रत्येक तालुक्याची स्वतंत्र ओळख राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण करता येईल..

अर्थात इथल्या पाण्यात, इथल्या जमनीत, इथल्या झाडाझुडपात, येथल्या द-या खो-यात उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करुन माणसाच्या हितासाठी, आर्थिक विकासासाठी, मनोरंजनासाठी अथवा गरजेसाठी, आर्युवेदीक, सेद्रीय वस्तू निर्मीती करुन गृह उद्योग ते सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग धंदे उभारता येतील. लक्झरी सेवा देता येतील. अर्थात यासाठी केंद्र,राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेवून यांचा शुभारंभ येथल्या स्थानिक भुमी पुत्राला करता येईल.आवश्यकता आहे ती तशा स्वतः पुढाकार घेवून उद्योजकीय जिगरी मानसिकतेची !

मागील दीड वर्ष कोरोना महामारी मुळे सर्व प्रस्थापित संदर्भ बदलेत. महानगरातला आपला चाकरमानी आता विचार करायला लागलाय, 'गड्या आपला गावच बरा'. यासाठीच आपली उद्योजकता कृषी,मस्य, फलोद्यान, नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा विचार करुन वास्तवतेत आणायची अर्थात हे आव्हान  आहे आणि ते पेलण्याचे सामर्थ्य इथल्या सिधुभुमीपुत्रात आहे. निर्धार करा.. जगण्याचा, जिंकण्याचा !
 
लक्ष्या तुझे हसणे विसरु नकोस, ये गावी परत !

- सुनील देसाई
9422206542

(लेखानंतर मनात रोजगार भांडवल आणि उद्योगसंधी याबद्दल प्रश्न असतील तर लेखाचे लेखक सुनील देसाई यांना संपर्क साधा. मागच्या चार दशकात सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योजकीय चळवळीतून प्रशिक्षण, स्वयंरोजगार या सूत्रावर अनेक उद्योजक घडवणारे मार्गदर्शक अशी त्यांची ओळख आहे. सध्या सुनील देसाई हे एमसीईडीच्या कॉयर इंडस्ट्रीचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत )

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.