हा अबोला बरा नाही !


मी कधी केली न माझ्या 
वेदनांची रोषणाई
मी दिवाळी सोसण्याची
साजरी साधीच केली

घावही त्यांनीच केले
दंशही त्यांनीच केले
शेवटी श्रद्धांजलीची
भाषणे  त्यांनीच केली

मधुसूदन नानिवडेकर यांच्या फेसबुक वॉलवरच्या ह्या चार दिवसांपूर्वीच्या ओळी ! आज नानिवडेकर नसताना श्रद्धांजली शब्द वाचणे हे वेदनादायी बनलं आहे. मधुसूदन नानिवडेकर यांची ओळख गझलकार, कवी, पत्रकार, साहित्यिक, आणि एक निखळ जगणं लाभलेला माणूस अशीच होती. दैनिक महाराष्ट्र टाईम्स मध्ये सिंधुदुर्ग आणि कोकण बद्दल अत्यंत तडफेने लिहिणारा एक सच्चा पत्रकार निधन पावल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या केवळ साहित्य आणि पत्रकार विश्वाचीच नाही तर समाजभान जपणाऱ्या माणूसमंडळींचीही एक हानी झालीय.

मी लिहू शकणार नाही
आत्मवृत्ताचे रकाने
तेवढा आहे कुठे
साधासुधा इतिहास माझा 

नानिवडेकर यांच्या जगण्यातला साधेपणा त्यांच्या ओळीत उतरायचा जेव्हा तू जिव्हार बनायचा. ओलेतेपण, राधा, मेघ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे रुक्षपणाच्या विरोधाभासला ते नेहमी अफलातून सरकारी उपमा द्यायचे.

हे तुझे हासणे  की तुझा हुंदका
एकदा ठरव ना तू तुझी भूमिका 
देश अवघाच हा डळमळू लागला
 काय करणार सांगा नगरपालिका

मधुसूदन नानिवडेकर यांच्या काव्यरचनेचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य हे होते की ती आजच्या भाषेत बोलत. साहित्यकृतीत आजचे बोलणे म्हणजे वाचकाला संवाद वाटतो आणि तो त्या रचनेत स्वतःला शोधत राहतो

दुर्लक्ष करण्या ऐवजी
'लाईक' करते ती...
नेहमी अष्टौप्रहर घाईत असते ती..

नानिवडेकर यांचे हे काव्यधन म्हणजे आईच्या श्लोकाची जगण्यात उतरलेली काव्यगाथा होती. १८ मे १९६० रोजी जन्मलेल्या या अलौकिक प्रतिभावंताने कुठल्याही प्रतिष्ठेचा मोह देहावर चढू दिला नाही. नवव्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्षपद सोहळा झाल्यावर ते मंडपातच विसरले होते आणि म्हणून दर्दी लोकांच्या संगतीत स्थळ काळ भान नसलेल्या त्यांच्या गझला आभाळातल्या चंद्राचे औक्षण करत गेल्या.

भेटायचे असेल तेव्हा
जरूर भेटू 
नको काळजी
तोवर ठेवू जपून आपण
काळजामध्ये चंद्रकवडसा
              
नानिवडेकर यांच्या जाण्याने एक फार मोठी अपरिमित हानी झालीय. काही माणसे आपल्यासोबत असणे ही आपल्या जगण्याची गरज असते. नानिवडेकर लिहिताना अश्रूच्या थेंबाना अत्तराचा फाया करून आभाळभर मांडत आणि ओलेता पाऊस मग ढगांना भिजवायचा ! मधुसूदन नानिवडेकर यांच्या जाण्याने यापुढे आषाढाच्या पहिल्या दिवशी दूरच्या प्रवासाला निघालेला हा मेघदूत कायम आठवत राहील.. प्रत्येक पावसात.. प्रत्येक आषाढात आणि प्रत्येक वेळी राधा शब्द उच्चारताना ! आणि मग स्वतःशीच स्वतःचे भांडण होईल आणि मग ओळी स्मरत राहतील

हा अबोला ठीक नाही
हा अबोला ठीक नाही !
             


           

Post a Comment

10 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

    ReplyDelete
  2. भावपूर्ण श्रद्धांजली💐

    ReplyDelete
  3. भावपू श्रद्धांजली

    ReplyDelete
  4. भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete
  5. आदरपूर्वक श्रद्धांजली 🙏

    ReplyDelete
  6. खूपच दुःखद घटना
    भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐

    ReplyDelete
  7. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

    ReplyDelete
  8. भावपूर्ण श्रद्धांजली...

    ReplyDelete
  9. भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete