बोकड पाळणारा चाकरमानी

कोकण म्हटले की हिरवीगार शेती आणि निळाशार समुद्र आठवतो ! आजपर्यंत उभ्या केलेल्या या चित्रात अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपला स्वताचा रंग घेऊन उभ्या आहेत. मागील काही वर्षांत पारंपरिक गोष्टीला छेद देत काही तरुण स्वतःची ओळख निर्माण करतायत. त्यातले एक नाव खूप वेगळे आहे. आपल्या शिक्षण पद्धतीत नाही शिकलास तर बोकड पाळायला देईन अशी जी पूर्वापार धमकी देण्यात येतेय, त्याच प्रांतात आता एक मुलगा विज्ञान शाखेचे उच्च शिक्षण घेऊन चांगली नोकरी सोडून गावी 'बोकड' पाळतोय हे ऐकूनच विश्वास बसत नाही. पण तळवडे गावच्या आपल्या कॅलिफोर्निया 30 या आपल्या गोट फार्ममध्ये काम करत असलेल्या सुमीत भोसले यांना आपण पाहिले की आपला आपल्यावरच विश्वास बसत नाही

शेळीपालन म्हणजे पारंपारिक पद्धतीने केला जाणारा व्यवसाय याच समजातून शिकलेल्या वाढलेल्या एका पिढीने त्या श्रीमंत व्यवसायातून फारशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाच नाही. मात्र मागच्या काही वर्षांत सुशिक्षित तरुणाची शेळीपालन या व्यवसायात नफा कमवण्यासाठी घेतलेल्या यशस्वी कहाणी वाढतायत. मुंबईत प्रभादेवीतल्या या सुमीतची गोष्ट अशीच काहीशी आहे. भौतिकशास्त्रचा पदवीधर असणारा सुमित साऊंड इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला. त्यानंतर साडेसात वर्ष जॉब केला आणि मग परदेश दौऱ्यात शेती आणि शेतीपूरक व्यवसायातील श्रीमंती उमजली. आणि मग मुंबईच्या नोकरीला रामराम ठोकून हा चाकरमानी कोकणात शेती करायला आला आणि जन्म झाला कॅलिफोर्निया-30 चा !

शेळीपालनाच्या पारंपरिक गृहितकांवरून सुरु झालेला व्यवसाय सुमीतला उद्योजक नाही तर शिक्षक बनवत गेला. साधारणपणे शेळी विकत आणल्या की आपल्या आपल्या त्या जगतात आणि आपण फक्त विकून पैसा कमवायचा असा समज अनेकांचा असतो. मात्र व्यवसायाचे एक गणित असते तुमचे तुमच्या व्यवसायाकडे जेवढं दुर्लक्ष तेवढा तुमचा नफा तुम्हाला आपोआप वजावट होऊन मिळतो. शेळीपालनाच्या लाखो रुपयाच्या नफ्यात आपलं दुर्लक्ष तेवढ्याच खर्चाच्या डोंगराकडे नेतो हे विसरून चालणार नाही. सुरुवातीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक शेळ्यांच्या अभ्यासावरुन मग सुमीतने दौरा केला तो राजस्थान प्रांतातील शेळ्यांचा!
सुमीत आज प्रामाणिकपणे शेळीपालन हा जोडधंदा नाही तर स्वतंत्र पूरक व्यवसाय असल्याचे ठामपणे सिद्ध करतोय.सुमीतच्या शेळीपालनाच्या व्याख्यानातून तो आज हजारो नवे शेळीपालक उद्योजक तयार करतोय. शेळीपालनाच्या वाटेवर शिकवण्याची सुरुवात तो हिरवा चारा नियोजन, वैद्यकीय काळजी, आणि लाखोंच्या अर्थकरणाचे नियोजन या गोष्टीने करतो. सावंतवाडीतल्या कॅलिफोर्निया30 मध्ये आजही उत्साहाने अगदी तिकीट लावूनही तो या सगळ्या गोष्टी मन लावून शिकवतो.


 
सुमित भोसले 2014 पासून हा व्यवसाय करतोय. मागील काही वर्षात सुवर्णकोकण सारख्या संस्थांच्या माध्यमातून कोकणातील श्रीमंती शेळीपालन या विषयावर वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्र या माध्यमातून बोलत असतो. बंदिस्त शेळीपालनातुन लाखोंचा नफा हे तो सप्रमाण आणि मुद्देसूद शिकवतो तेव्हा ऐकणारा व्यवसायासाठी नाही तर हौसेसाठी तरी शेळीपालनाकडे वळतोच हे त्याचे अद्भुत संवादकौशल्य आहे. मुळात लाखाची गोष्ट शिकवताना तो सुरुवात तोट्यापासून करतो आणि मग हळूहळू श्रीमंती उलगडतो.

शेळीपालन उद्योगातील यशस्वी कहाणी अनेक जिल्ह्यात अनेकांनी निर्माण केल्या आहेत. पण सुमीतची गोष्ट वेगळी आहे. मुंबईकर तरुण गावी येतो, जॉब सोडून गावी शेळ्या पाळण्याचा निर्णय घेतो. आणि मग त्याची मुंबईकर पत्नी अक्षया भोसलेही गावी स्थायिक होते. आणि दोघे मिळून पुन्हा शिक्षणाच्या वाटेवर निघतात. या दांपत्याची गोष्ट आज लॉकडाऊनमध्ये मुंबईकर चाकरमानी तरुणांच्या सेकंड इन्कमच्या पर्यायाच्या काळात खूप मोठी आहे

शेळीपालनाच्या गोष्टी या वाचून नाही तर त्या प्रत्यक्ष गोट फार्मला भेट देऊन समजतील. बिझनेस बिझनेस असतो आणि माईंडसेट हा माईंडसेट असतो. 'पास झालास तर बोकड घेऊन देईन' हा विषय आपण गंमतीनेही नाही म्हणू शकत. इन्कम रिसोर्स आणि वेल स्टडीड बिझनेस म्हणून फुलत जाणारे गोट फार्मिंग आता वेगळ्या वाटेवर निघालेय. आणि ही वाट सुमीत सारख्या तरुणांनी कोकणाकडे पुन्हा परतणाऱ्या स्वप्नाना फुलवतेय


व्यवसाय म्हटला की त्यात नफ्यातोट्याचा अभ्यास हा आलाच. आजघडीला सुमीत आणि अक्षया या दोघांनी मिळून कॅलिफोर्निया 30 नावाचा गोट फार्म हा फक्त गोठा बनवला नाहीय तर शेळी नाबाची गोष्ट जगवायला शिकवणारी एक शाळा बनवलीय. ह्या गोष्टी लिहून वाचून नाही तर पाहूनच समजतील.. आणि जोपर्यंत ह्या समजत नाहीत तोपर्यंत नजरेसमोरुन दर आठवड्यात बुधवार, शुक्रवार, रविवार सरकत राहतील..

जमलं तर फिरत फिरत गेलात तर तळवडेच्या कॅलिफोर्निया30 आणि सुमीत भोसले नक्की भेटा.. तिथपर्यंत जाण्याची वाट कॉमन असेल येताना मात्र तुमची वाट नक्की बदलली असेल !

कॅलिफोर्निया30 फार्म्स
मु. पो. तळवडे, गडगेवाडी, सिद्धिविनायक मंदिर समोर, तालुका:सावंतवाडी, जिल्हा: सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. ४१६५२९

संपर्क क्रमांक : 9833654857 / 8329221693

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. मस्त!! व्यावसायिक दृष्टीकोन

    ReplyDelete
  2. अशी मानसीकता ,व्यावसायिक दृष्टीकोन प्रत्येक सुशिक्षित नागरीकाकडे असणे गरजेचे आहे.

    ReplyDelete