तो पहा विटेवरी !

महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या बापरखुमादेविवरु असणाऱ्या विठ्ठलाला आठवणे आणि स्मरणे हा अवघ्या महाराष्ट्राचा नामछंद ! याच नामछंदातुन अवघ्या समाजजीवनाचे एक गतिचक्र सुरु असते. पांडुरंगाच्या वारीतला महाराष्ट्र आणि कामातून विठ्ठल शोधणारा महाराष्ट्र हा पिढयानपिढ्याचा प्रवास आपल्यासोबत विठ्ठलघोष आसमंतात निनादत ठेवतो. आणि याच आपणच आपल्याला शोधायाला निघालेल्या आपल्या वारीत एक नवा विठ्ठल गवसतो.. मागील काही वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक युवक असाच विठ्ठलानुभव मांडताना एक वेगळाच अनुभव देतोय. तब्बल सोळा विटेवर साकारलेले विठुराय कलाकृतीच्या माध्यमातून एक अलौकिक विठ्ठलरंग उभा करुन जातो तेव्हा संत नामदेवांच्या ओळी आठवतात, "योगीयांचे ब्रम्ह शून्य व्योमाकार, आमुचे साकार विटेवरी"..


"गीता जेणे उपदेशिली | ते हे विटेवर माऊली" या अशा ओळीतून संत तुकोबाराय विटेवरचे अलौकिकपण सांगतात. याच विटेवरच्या रुपाला पुन्हा विटेवर साकारलंय चित्रकार अक्षय मेस्त्री याने !


देवगड तालुक्यातील गव्हाणे इथला युवा प्रतिभावंत चित्रकार अक्षय मेस्त्रीची प्रत्येक अदाकारी केवळ विठ्ठल साकारत नाही तर रसिकांना पंढरपूरची अनुभुती देतो. असे म्हणतात की, पुंडलिकाच्या विटेवर गेली अठ्ठावीस युगे पंढरीचा राणा उभा आहे. विटेवरच्या या मायबापाला साक्षात विटेवर साकारणे हाच एक वेगळा प्रयत्न आहे. 


विटेवरचा पांडुरंग खरंच एक वेगळा आणि आव्हानात्मक प्रयत्न आहे. अक्षयच्या अदाकारीतून तो पांडुरंग ज्या पद्धतीने प्रकटलाय त्याला दाद देताना तुमचे रसिकपण नाही तर भाविकपण जागृत होते हीच त्यांची खरी पावती आहे.


महाराष्ट्राचे हे लोकदैवत राबणाऱ्या हाताचे आहे त्यामुळे ते मातीच्या कणाकणात साकारले आहे. अक्षयच्या प्रत्येक विठ्ठल कलाकृतीत या मातीतले विठ्ठलाचे असलेले रुजीवपण नेहमी जाणवत राहते. त्याच दरवर्षी नव्या विठ्ठलरुपाकडे जाताना इतरांना आनंदवारी घडवणे हा विलक्षण अनुभव आहे. अक्षयने मागच्या वर्षी कोरोनाकाळात साकारलेला विठ्ठल पाहणं यासाठी प्रत्येकाला आभाळ बनावं लागलं होतं 

जवळ जवळ दीड एकरात साकारलेल्या निळाईचे हे हिरवंगार रूप ! कासार्डेजवळच्या शेतमळ्यात जेव्हा ही विठ्ठल अनुभूती सर्वांनी पाहिली तेव्हा सर्वचजण थक्क झाले. केवळ ड्रोनच्या सहाय्याने जेव्हा याची दृष्ये समोर आली तेव्हा अक्षयने या हिरव्यागार रूपासाठी केलेली हिरव्या रंगाची जाणीव सुखद होती.

खरंतर अक्षयचे विठ्ठल साकारणं जस एकरभर आहे तसे ते एका इवल्याशा पानभर देखील आहे. होय, हे खरं आहे अक्षय मेस्त्रीच्या इवल्याशा कलाकृतीने विठ्ठल दिसलाच पण त्या निमित्ताने अक्षयचे वेगळेपणही जाणवले.

अक्षय मेस्त्रीसाठी विठ्ठल रूप साकारताना कॅनव्हास हा बदलत जातो. कधी विटेवर, कधी तुळशीच्या पानावर, तर कधी हिरव्यागार शेतमळ्यावर !

कलाशिक्षण घेतलेला अक्षय मेस्त्री हा एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उदयोन्मुख प्रतिभावंत चित्रकार आहे. अक्षय आपल्या चित्रकलेमधून नेहमीं सामाजिक संवेदना जागृत करतो. त्याच्या सृजन आर्ट गॅलरीच्या माध्यमातून नवनवीन चित्रकृतीचे एक भव्य दालन कला रसिकांना भविष्यात पर्वणी ठरणार आहे.

नव्या पिढीचा एक दमदार सिंधुदुर्ग जिल्हावासीय म्हणून अक्षय मेस्त्रीचा धडपड्या स्वभाव अनेकांना प्रेरक बनलाय. कोकणातील चांदणरातीचे अनोखा निसर्गाचा काळभोर कॅनव्हासन पर्यटकांना उलगडण्यासाठी कोकण रात्र हा त्याचा उपक्रम आडवाटेवरच्या पर्यटन भ्रमंतीला निघालेल्या पर्यटकांना मोहित करतोय..तर त्याचवेळी गडकोट संवर्धनासाठी 'हाक अस्मितेची हा उपक्रम नव्या तरुणाईला इतिहास आणि वर्तमानाची सांगड घालत जाज्वल्य शिवसंस्कृतीची जाणीव करून देतोय !

अक्षय समाजभान जपणारा एक प्रतिभावंत कलावंत आहे. अक्षय केवळ रंगातून नाही तर कलेतून आज नवा सिंधुरंग मांडतोय.. त्याच्या या प्रतिभावंतपणास आणखी मोकळे आभाळ मिळो याच शुभेच्छा !

अक्षयच्या या कलाकृती पाहण्यासाठी तुम्हाला देवगडमधील गव्हाणे गाव गाठावे लागेल. कधी देवगडला गेलात तर अक्षयसाठी गव्हाणेला नक्की जा ! आणि हो तिथलं विठ्ठल मंदिरही आवर्जून पहा

अक्षय मेस्त्री, सृजन आर्ट गॅलरी , गव्हाणे देवगड
संपर्क क्रमांक - 7744833983

© sindhudurg360°

Post a Comment

5 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.