महाराष्ट्राला साडेसातशे किलोमीटरपेक्षा जास्त लाभलेली सागर किनारपट्टी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. मत्स्यव्यवसाय आणि मच्छीमार हा या समाजजीवनाचा एक अविभाज्य घटक मानला जातो. आज बदलत्या काळात पारंपरिक मच्छीमारीला नवे रूप देण्यासाठी आता महाराष्ट्र सरकार सरसावले आहे. मत्स्य व्यवसाय विभागात नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या वापरासाठी नाविन्यता सोसायटीच्या सहयोगातून आता ‘महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मत्स्य व्यवसायाचे योगदान खूपच महत्वपूर्ण आहे. राज्याची लोकसंख्या आणि फिश प्रोटीनची वाढती मागणी लक्षात घेता मत्स्यव्यवसाय अधिक परिणामकारक आणि अधिक गतिशील करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागातील समस्या जाणून घेणे आणि त्यावर नावीन्यपूर्ण उपाय शोधणे या उद्देशाने महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज उपक्रमात विभाग सहभागी होत आहे. या उपक्रमातून पुढे येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करुन विभागाचे कामकाज अधिक प्रभावी करण्यात येणार आहे
मासे पकडणे, उत्पादन आणि मासे प्रक्रियेसंदर्भातील सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक बाबींच्या आकलनानंतर विविध समस्या, आव्हाने समोर आली, जी स्टार्टअपच्या आधारे काही नवीन पध्दतीने सोडवली जाऊ शकतात. याच हेतूने मत्स्यव्यवसाय विभागाच्या मुख्य ४ समस्या विधानांसाठी नावीन्यपूर्ण उपाय सुचविण्याकरीता आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात जगभरातील नवउद्योजक सहभागी होऊ शकतात.
मोठ्या आकाराच्या फिशपॉन्डचे स्वयंचलितीकरण (Automation), मत्स्यपालन प्रणाली (आरएएस) आणि बायोफ्लॉक (बीएफ) तंत्रज्ञानाची पुनर्रचना, बोटी, हार्बर आणि जेट्टीसाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर, माशांच्या कचऱ्याचा प्रभावी उपयोग या प्रमुख ४ समस्या विधानांसाठी उपाय सुचविण्याकरीता हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या योजनेसाठी अर्ज करण्याकरीता https://www.msins.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.